Bhandara Tendernama
विदर्भ

Bhandara : नगरपालिकेकडून मॉन्सूनपूर्व स्वच्छतेची कामे सुरु

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : पावसाळ्यात तुंबलेल्या नाल्यांमुळे रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावे लागते. खालच्या भागातील वस्त्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच पावसाळा सुरु होण्यापूर्वी नगर पालिके कडून नदी नाले साफ सफाई अभियान सुरु केले गेले आहे. यासाठी कंत्राटी पद्धतिने काम करण्यासाठी मजूरांची नियुक्ति केली गेली आहे. 

नगरपालिकेतर्फे अनेक कामे केली जात आहे. त्यात सांडपाण्याचा योग्यप्रकारे निचरा कसा करावा, नदी आणि नाले सफाई, रस्त्यावरील खड्डे बुजविने असे अनेक काम केले जात आहे. 3 मे पासून ही कामे युद्धस्तरावर केली जात आहेत. शहरातील काही अपवाद वगळता जवळपास सर्व मोठे व मध्यम नाल्यांच्या सफाईची कामे पुर्णत्वास आली असून ही मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. पावसाळा तोंडावर असल्याने मानसूनपूर्व कामांना वेग आला आहे. नगरपरिषदेच्या वतीने खासगी मनुष्यबळाचा वापर करून शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई केली जात आहे. नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून नियोजनबद्धरित्या टप्प्याने ही कामे करण्यात आली. 1 लाख 10 हजारांवर लोकसंख्या असणाऱ्या भंडारा शहरालगत वैनगंगा नदी वाहते. पावसाळ्यात नदीला पूर आला की, शहरातील बऱ्याच भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. मोठ्या नाल्यांमधून पाणी शहरात पोहोचते. जिल्हा सामान्य रूग्णालय, बसस्थानक परिसर, राष्ट्रीय महामार्ग परिसरात मोठे नाले आहेत. या नाल्यांमुळे पावसाळ्यात पुराची भीती असल्याने पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती व केंद्रस्थानी असलेल्या नाल्यांच्या सभोवताल वाढलेली झाडे झुडपे कापून त्यात तुंबलेला प्लास्टिक व पाणी वाहून जाण्यासाठी अवरोध निर्माण करणारा कचरा व गाळ सफाईची कामे हाती घेण्यात आली होती. नगरपरिषदेने महिनाभरा पूर्वीपासून सफाईची मोहीम राबविली असून 30 ते 35 कंत्राटी मजुरामार्फत पावसाळ्यापुर्वी शहरातील संपूर्ण नाल्यांची स्वच्छता केली जात आहे.

या परिसरात असतो पुराचा धोका : 

कस्तुरबा वॉर्डातील झोपडपट्टी, ग्रामसेवक कॉलनी परिसर, संत कबीर वॉर्ड, नेहरू वॉर्ड, भगतसिंग वॉर्ड, नवीन टाकळी, सागर तलावाचा खालचा परिसर, रूख्मिणीनगर, वैशालीनगर हे परिसर खालच्या भागात असल्यामुळे इथे पाणी साचतो तर पुर आल्यास अनेक घरात पाणी घुसतो. या ठिकाणी पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती टाळण्यासाठी नगरपरिषदेने आधीच सफाईची कामे हाती घेतली आहेत. 

90 टक्के कामे पूर्ण : 

भंडारा शहरात मुख्य नाल्यासह लहान-मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे 90 टक्के पुर्णत्वास गेली आहेत. रविंद्रनाथ टागोर वॉर्ड, शिव मंदिर, संताजी वॉर्ड, लाला लजतपराय वॉर्ड, संत कबीर वॉर्ड, मोठा बाजार, बैरागी वॉर्ड, बसस्थानक, जिल्हा रूग्णालय तसेच प्रभाग क्रमांक 4 ते 7 व 14 ते 16 भागातील नालेसफाईची कामे पूर्णत्वास गेली आहेत. भैय्याजीनगर ते नागपूर नाका नाला व तुरळ नालेसफाई बाकी असून तीसुद्धा दोन तीन दिवसांत पूर्ण होईल. अशी माहिती करणकुमार चव्हाण, मुख्याधिकारी नगर परिषद यांनी दिली.