Bhandara Tendernama
विदर्भ

Bhandara : प्रशासनाने पुरस्थितिची पूर्वतयारी केली का? अनेक कुटुंबांवर का आली पुनर्वसनाची वेळ?

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : आंतरराज्य सीमेवर असणाऱ्या बपेरा गावाला बावणथडी नदीचे काठ टेकले आहे. शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी गावांचे शिवारात जागाच उपलब्ध नसल्याने श्रेणी-1चा पशु दवाखाना गेल्या दहा वर्षांपासून समाज मंदिरात स्थिरावला आहे. आठवडी बाजाराच्या शेजारी असणाऱ्या आरोग्य उपकेंद्रात पावसाळ्यात पुराचे पाणी वेढले जात असल्याने आरोग्य सेवा ऐरणीवर येत आहे.

पावसाळ्यात बपेरा गावाच्या दिशेने बावणथडी नदीचा पूर उग्र रूप धारण करीत असल्याने गावाला काठ टेकले आहे. दरवर्षी गावात शिरलेल्या पुराच्या पाण्याने घरे खचली आहेत. गावाच्या शेजारी गावातील 125 कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पुनर्वसन जागेत ग्रामपंचायत इमारत, सभागृह बांधकाम करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उर्वरित जागा शिल्लक ठेवण्यात आली आहे.

गावात श्रेणी 1 चा पशु दवाखाना मंजूर करण्यात आलेला आहे. पशू दवाखाना इमारत बांधकाम करण्याचे प्रयत्न अनेक वेळा करण्यात आले आहेत. गावांचे शिवारात जागेचा दोनदा शोध घेण्यात आलेला आहे. परंतु बुडीत व पूरग्रस्त जागेचा ठपका गावांचे शिवारात लागला असल्याने इमारत बांधकामाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. पुनर्वसन वसाहतीत जागा शिल्लक असताना या जागेत पशु दवाखान्याची इमारत बांधकामावर शिक्कामोर्तब झाले नाही. 

नदीच्या काठालगत अनेक घरांत नागरिकांचे वास्तव्य आहे. या घरांत दरवर्षी पुराचे पाणी शिरत असल्याने घरे रिकामी केली जात आहेत. आरोग्य उपकेंद्र दरवर्षी पुराच्या पाण्यात वेढले जात आहे. तब्बल चार दिवस ही इमारत पुराच्या पाण्यात राहत असल्याने पूर ओसरताच घाण, चिखल, दुर्गंधी येत आहे. यामुळे पावसाळ्यात आरोग्य केंद्राचेच आरोग्य ढासळत आहे. दवाखाना उंच भागात असल्याने पुराचे पाणी शिरत नाही.

आठवडी बाजाराची जागाही नदीपात्रात

गुरुवारी आयोजित होणाऱ्या आठवडी बाजारात सीमावर्ती गावातील ग्राहक भाजीपाला खरेदीसाठी जात आहेत. मध्य प्रदेशातील सीमावर्ती गावातील नागरिक या बाजारात हजेरी लावत आहेत. आठवडी बाजाराची जागा नदीच्या वाढत्या पात्रात गेली असल्याने जागा अपुरी पडत आहे.

वन विभागाच्या जागेत गावकऱ्यांचे अतिक्रमण

जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वन विभागाची झुडपी जंगल नोंद असणारी जागा आहे. गावात घरांचे बांधकाम करण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने वन विभागाची झुडपी जंगलाची जागा गावकऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. या जागेत घरांचे बांधकाम केले असल्याने आता उरलीसुरली जागाही उपलब्ध राहिली नाही. गावांच्या शेजारी बुडीत जागेत नेटवर्क टॉवर लावण्यात आले आहे. या टॉवरच्या चहू बाजूंनी पुराचे पाणी राहते.