Bridge Tendernama
विदर्भ

Amravati : साडेसहा वर्षांनंतरही 'या' पुलाचे बांधकाम अपूर्णच; नागरिकांना...

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत उड्डाणपुलाच्या बांधकामाचा करारनामा दोन वर्षांचाच असताना आता साडेसहा वर्षांनंतरही ते काम पूर्ण झाले नाही. या उड्डाणपुलाचे जागोजागी अर्धवट बांधकाम, विस्कळीत वाहतूक, नागरिकांची जीवघेणी कसरत अशा एक ना अनेक समस्या चित्रा चौक ते नागपुरी गेट यादरम्यान दरदिवशी सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल शापित तर ठरत नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

नागपूर येथील मे. चाफेकर अँड कंपनीकडे अमरावती-अचलपूर प्ररामा- 14 वरील अमरावती शहरातील चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंतचा उड्डाणपुलाचे बांधकाम व स्लीप, सेवा रस्त्यांची सुधारणासह बांधकाम करण्याचा कंत्राटवजा करारनामा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता. या करारनाम्यानुसार 24 महिन्यांत हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करणे अपेक्षित होते. मात्र 4 जानेवारी 2018 रोजी करारनामा होऊनही आता साडेसहा वर्षांनंतरही पुलाची निर्मिती अपूर्ण आहे. अर्धवट कामामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्ग शोधावा लागतो. या उड्डाणपुलाच्या बांधकामाखाली अतिक्रमण, हातगाड्या, भाजीपाला विक्रेते आदी व्यावसायिकांचा ठिय्या ही नित्याचीच बाब झाली आहे. दुचाकीचालकांना तर सायंकाळी ईतवारा बाजारातून मार्ग शोधणे हे फारच बिकट होऊन जाते. या गंभीर बाबीकडे महापालिका प्रशासन अथवा शहर वाहतूक कक्षाचे दुर्लक्ष होत आहे.

इतवारा बाजारातील व्यावसायिक त्रस्त : 

उड्डाणपुलाचे अर्धवट बांधकामामुळे इतवारा बाजारातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. इतवारा बाजारात घाण ही पाचवीलाच पुजलेली आहे. अस्वच्छता, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, खराब भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकणे यासह मार्गावर पाणी साचणे, दुकानात पाणी शिरणे, साहित्य आणि वस्तूचे नुकसान आदी समस्यांनी नागरिकांसह व्यावसायिक हतबल झाले आहेत.

कंत्राटदाराला अभय का?

नागपूर येथील मे. चाफेकर अँड कंपनीकडे चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंतचा उडाणपुलाचे बांधकाम करण्याचा करारनामा झाला असताना तरीही बांधकाम पूर्ण झाले नाही. असे असताना कंत्राटदाराविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. एजन्सीच्या मर्जीनुसारच कामे होत असताना अभियंते मात्र डोळेझाक करीत आहेत. अर्धवट बांधकाम निधीचे कारण पुढे करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंत्राटदाराला कोणाचे राजकीय पाठबळ आहे, हा विषय या भागात चर्चिला जात आहे. चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंतचा उड्डाणपूल निर्मितीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 20 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून बंद असलेले बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. करारनाम्यानुसार पुलाचे बांधकाम वेळेत झाले नाही. हे वास्तव आहे. अशी प्रतिक्रिया तुषार काळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती यांनी दिली.