Gharkul Yojana Tendernama
विदर्भ

Gadchiroli : आता कुठे जायचे? 2800 घरकुलांचे बांधकाम निधीअभावी थांबले अर्ध्यावरच

टेंडरनामा ब्युरो

गडचिरोली (Gadchiroli) : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मागील आठ वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात सुमारे 31 हजार 610 घरे मंजूर करण्यात आली आहेत. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुमारे 2 हजार 856 घरे अपूर्ण आहेत. यातील काहींना चौथा व पाचवा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे घरावर छत पडले नाही. राहते घर पाडले. घरकुलही पूर्ण झाले नाही. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कच्चे घर असलेल्यांना घरकुल मंजूर केले जाते. या योजनेंतर्गत घर बांधकामासाठी शासनाकडून दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. आजच्या वाढलेल्या महागाईचा विचार केला तर दीड लाख रुपये घर बांधकामासाठी अत्यंत कमी आहेत. अनेक नागरिक घर एकदाच होते असा गैरसमज करून आपल्या आर्थिक क्षमतेपेक्षा मोठ्या आकाराच्या घराचे बांधकाम सुरू करतात. मात्र, पैसा पुरत नाही. घराची एक विशिष्ट उंची झाल्याशिवाय पुढचा टप्पा दिला जात नाही. मात्र, काही जणांचे नियोजन चुकत असल्याने त्यांचे घर एक विशिष्ट उंची गाठत नाही व पुढचा टप्पा त्याला मिळत नाही, परिणामी घरकुल अपूर्ण राहते.

अनुदानाच्या रकमेत घर बांधायचे असेल किचन, हॉल, बेडरूम, बाथरूम, शौचालय तर ते 270 चौरस फुटांचे असावे. त्यात यांचा समावेश आहे. मात्र, काही लाभार्थी अतिशय मोठे घर बांधण्यास सुरुवात करतात. छतावर टिन किया सिमेंटचे पत्रे टाकले तरी चालते. मोठे घर बांधायचे असेल तर सर्वप्रथम शासनाच्या नियमानुसार दोन खोल्यांचे घर बांधून द्यावे. त्याला चाल ठेवावी. नंतर आपल्या नुसार घराचा विस्तार करावा. अशी प्रतिक्रिया गडचिरोली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सहायक प्रकल्प संचालक सोमेश्वर पंधरे यांनी दिली. 

डेमो हाऊसचे एक अवलोकन : 

पक्के घर म्हणजे घरावर स्लॅबचे छत असा एक समज नागरिकांच झाला आहे. स्लॅबचे घर बांधण्यासाठी पाया, बीम, कॉलम अतिशय मजबूत असावे लागतात. तेवढा सीमेंट व लोहा यात वापरला जात असल्याने घरकुलाचे पैसे पुरत नाही. दीड लाख रुपयांमध्ये घर कसे बांधावे यासाठी शासनाने नमुना म्हणून प्रत्येक पंचायत समिती स्तरावर डेमो हाउस बांधले आहे. डेमो हाउसवर टिनाचे छत टाकण्यात आले आहे.

अपूर्ण असलेले तालुकानिहाय घरकुल

अहेरी - 808

आरमोरी - 30

भामरागड - 53

चामोर्शी - 375

देसाईगंज - 181

धानोरा - 122

एटापल्ली - 211

गडचिरोली - 257

कोरची - 72

कुरखेडा - 118

मुलचेरा - 32

सिरोंचा - 597

एकूण अपूर्ण घरकूल 2,856