Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur: स्मार्ट सिटी प्रकल्पातील 250 कोटींची कामे कधी होणार पूर्ण?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : केंद्रीय शहरी विकास व गृहनिर्माण मंत्रालयाने स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत वर्षभरासाठी वाढवली. परंतु स्मार्ट सिटीतर्फे पॅनसिटीअंतर्गत संपूर्ण शहरात जवळपास अडीचशे कोटींच्या विविध प्रकल्पांचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात ही कामे होतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत कामे येत्या 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु आता स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत जून 2024 पर्यंत अर्थात एक वर्ष वाढविण्यात आली आहे. शहरात पॅनसिटीअंतर्गत स्मार्ट पथदिवे, बायोमायनिंग, स्मार्ट हाऊसिंग यासह अनेक प्रकल्पाची कामे अजूनही सुरू आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात 3 हजार 600 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, स्मार्ट सिटीच्या प्रस्तावित क्षेत्रात भूसंपादनासह अनेक समस्या अजूनही आहेत. पूर्व नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कामांसाठी आता वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या. ही कामे संथगतीने सुरू आहे. स्मार्ट सिटीतर्फे पॅनसिटीअंतर्गत शहरात विविध ठिकाणी कामांच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

नुकतीच केंद्र सरकारने स्मार्ट सिटीची मुदत 30 जून 2024 पर्यंत वाढवली. परंतु सुमारे 250 कोटी रुपये खर्चाच्या पॅनसिटीअंतर्गत कामाच्या संथ गतीमुळे पुढील वर्षभरातही प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. भांडेवाडीत वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रियेचा प्रस्ताव आहे. बायोमायनिंगच्या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे 6 लाख मेट्रिक टन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी 47.20 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव असून एका खासगी एजन्सीला जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे तीन लाख मेट्रिक टन कचरा काढण्यात आला आहे. संपूर्ण कचरा उचलण्यासाठी मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसात 4 महिने काम रखडण्याची शक्यता असून मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याशिवाय 7.50 कोटी रुपयांचा स्मार्ट हाऊसिंग प्रकल्प, 9.50 कोटी रुपयांचा स्मार्ट पोलीस स्टेशन प्रकल्प आणि मल्टी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, 15 कोटी रुपये खर्चाच्या स्मार्ट फायर स्टेशनचीही हीच स्थिती आहे. यापैकी आतापर्यंत केवळ पोलिस ठाण्याचे काम पूर्ण झाले आहे.

पायाभूत सुविधांची कामे रखडली

शहरातील प्राईड हॉटेल ते एलआयसी चौक आणि प्रजापती मेट्रो स्टेशनपर्यंत 33 चौकांसाठी 5.36 कोटींचे इलेक्ट्रिक कँटी लिव्हर विद्युत खांब प्रस्तावित करण्यात आले आहेत. नरसाळा येथे पोहरा नदीवर 48 कोटींचा 20 एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शहरातील सांडपाणी पाईपलाईनचे जीआयएस आधारित मॅपिंगसाठी 3.9 कोटींचाही प्रकल्प आहे. वाहतूक पोलिसांसाठी 100 स्मार्ट पोलिस बूथ, स्मार्ट डस्टबिनची कामे अपूर्ण आहे. महापालिकेच्या मोडकळीस आलेल्या सहा शाळा व तीन ग्रंथालयाच्या इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव मागील वर्षी तयार करण्यात आला. शाळांमध्ये सुरक्षा भिंत, स्वच्छतागृह बांधणे, रंगरंगोटी या कामांचाही समावेश आहे, मात्र वर्ष उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. 2023-24 या शैक्षणिक सत्रासाठी शाळा तयार करून महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जातील, असा दावा आता केला जात आहे. परंतु अनेक कामे शिल्लक आहे.