Railway Tendernama
विदर्भ

Nagpur:अजनी रेल्वे स्टेशनला 'एवढे' कोटी खर्चून मिळणार एअरपोर्ट लूक

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मध्य रेल्वेच्या नागपूर स्टेशनपासून अवघ्या 2.8 किमी अंतरावर असलेल्या अजनी स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून मध्य रेल्वे या स्टेशनला एअरपोर्टचे स्वरूप देऊन विकसित केले जात आहे. या स्टेशन वर पिकअप ड्रॉप सेवा, एस्केलेटर, पूर्व-पश्चिम जोडण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज, वाहनांच्या वाहतुकीसाठी लिफ्ट, ऍक्सेस कंट्रोल सिस्टीम इत्यादी सुविधा असतील.

खोदकाम सुरू

मध्य रेल्वेच्या अजनी स्टेशन वर पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे. सध्या स्टेशनचे जुने व निरुपयोगी बांधकाम पाडण्याचे काम ग्राउंड लेव्हलचे काम सुरू करण्यात आले आहे. खोदकाम सुरु करण्यात आले आहे. वीज केबल, पाणी आणि मलनिस्सारण ​​पाईपलाईन स्थलांतरित करण्याबरोबरच ड्रोन सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे.

या सुविधांमुळे विकास होणार 

प्रवाशांसाठी पुरेशी आसनक्षमता आणि संचलनासह प्रतीक्षा क्षेत्र विकसित केले जाईल. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी कॉन्कोर्स परिसर विकसित करण्यात येणार आहे. नवीन पार्किंग विकसित करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मच्या वर रूफ प्लाझा कॉन्कोर्स विकसित केला जाईल.

प्रवाशांसाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी

रेल्वे स्थानकावर येणार्‍या प्रवाशांना शेवटच्या माईलच्या कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो स्थानकांसह इतर वाहतूक पद्धतींशी जोडले जाईल. रस्त्यावरील वाहनांसाठी ड्रॉप-ऑफ आणि पिक-अप क्षेत्र विकसित केले जातील. पश्चिम बाजूला स्टेशन इमारत दुरुस्ती केली जाईल. एवढेच नाही तर स्टेशनच्या पूर्वेला नवीन इमारतीचे नियोजन करण्यात आले आहे.

तीन नवीन एफओबी : 

स्टेशनवरील गर्दी आणि प्रवासी संख्या लक्षात घेऊन येथे 3 नवीन  फूट ओव्हर ब्रिज विकसित केले जातील. 2 एफओबी आगमन  1 निर्गमन एफओबी असेल. याशिवाय, 21 नवीन लिफ्ट, 17 नवीन एस्केलेटर, 6 नवीन प्रवासी वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन बसवले जातील, जे विशेषत: दिव्यांग लोकांसाठी तयार केले जातील.

प्रवाशांसाठी एअरपोर्टसारखी सुविधा

अजनी स्टेशनचा पुनर्विकास करून येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एयरपोर्टसारखी सुविधा देण्याचा रेल्वेचा उद्देश आहे. स्थानकाच्या आजूबाजूला अधिक जागा असल्याने शहराचे व्यापारी केंद्र व्हावे यासाठी विकासकामे केली जाणार आहेत, छतावरील प्लाझावर शॉपिंग सेंटर, वाहतुकीसाठी एअरपोर्टसारखी सुविधा असणार आहे. हा प्रकल्प तीन ते चार वर्षात पूर्ण होईल. अशी माहिती मध्य रेल्वे चे सीपीआरओ डॉक्टर शिवराज मानसपुरे यांनी दिली.