Gondia Tendernama
विदर्भ

Gondia : 162 कोटी खर्च करूनही रखडले 10 लघुसिंचन प्रकल्प

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : सालेकसा तालुक्यातील रखडलेल्या एकूण 10 लघु प्रकल्पांना तत्कालीन शासनाने 15 वर्षांपूर्वी एकूण 600 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी सर्व प्रकल्प मिळून एकूण 162 कोटी रूपये कामाच्या सुरुवातीला खर्च झाले. परंतु, त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी कामे बंद पडल्याने यावर केलेला सर्व खर्च व्यर्थ गेला आहे. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यापासून वंचित आहे.

पाटबंधारे तलाव कहाली हा प्रकल्प 32 लाख 90 हजार एवढ्या सुधारित किमतीच्या असून या प्रकल्पावर केवळ तीस टक्के रक्कम खर्च झाली. प्रकल्पाचे घळभरणी व कालव्याचे काम आजही अपूर्ण अवस्थेत आहे. आतापर्यंत 10 लाख 45 हजार रुपयांचा निधी या प्रकल्पावर खर्च झाला. लघु पाटबंधारे तलाव दंडारी हा प्रकल्प 45 लाख 15 हजार रुपये सुधारित किमतीचा असून यावर आतापर्यंत 14 लाख 90 हजार खर्च झाले. या ठिकाणीसुद्धा घळभरणी व कालव्याचे काम बाकी आहे. काही त्रुटींमुळे हा प्रकल्प रखडला. लघु पाटबंधारे तलाव मरामजोब हा प्रकल्प 34 लाख 59 हजार रूपये किमतीचा आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 24 लाख रुपये खर्च झाले. येथेसुद्धा कालव्याचे काम व इतर कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. लघु पाटबंधारे तलाव कारूटोला हा प्रकल्प 25 लाख रुपयांचा असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकूण 26 हेक्टर शेतीला याचा लाभ होणार होता. या प्रकल्पाला आता रोजगार हमी योजनेतून वगळले आहे. लघु पाटबंधारे तलाव मक्काटोला हा प्रकल्प 48 लाख 78 हजार एवढ्या किमतीचा आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत 25 लाख 45 हजार रुपये एवढा निधी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास 44 हेक्टर जमिनीला सिंचनाची सोय होईल.

वन कायद्यात अडकला प्रकल्प :

लघु पाटबंधारे तलाव जांभळी हा प्रकल्प 7 लाख 5 हजार रुपये एवढ्या किमतीचा असून, हा प्रकल्पसुद्धा वनजमीन कायद्यांतर्गत अडकून पडलेला आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत 3 लाख 39 हजार एवढी रक्कम खर्च झाली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास जवळपास 11 हेक्टर जमिनीला पाण्याची सोय होऊ शकते.