cctv Tendernama
विदर्भ

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दीड कोटींचे ‘सीसीटीव्ही कॅमेरे लागणार

टेंडरनामा ब्युरो

सावनेर (Savner) : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध चौकांमध्ये मोठ्या क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एक कोटीचा निधी तर बेरोजगारांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्यास ३० लाख असा एकूण १ एक कोटी ३० लाखांचा निधी मिळाला आहे.

नगरपालिकेच्या प्रस्तावाला सावनेरचे आमदार व राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, व्यवसाय, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी मान्यता मिळवून दिली आहे. शहरातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर विविध चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व सिग्नल लाईट बसविण्यात येणार असल्याचे नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील चाफेकर आणि व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार यांनी सांगितले.

तालुक्याची मुख्य बाजारपेठ, सरकारी व निमसरकारी यंत्रणेचे होणारे दैनंदिन कामकाज, शाळा महाविद्यालये, दवाखाने व इतर कामकाज, मध्य प्रदेश व राज्याच्या इतर शहरांना जोडणारे मार्ग, दिवसेंदिवस लोकवस्तीचा होणारा विस्तार आदी कारणाने शहरातील रस्त्यांवर दळणवळण वाढले. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेहमीच पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील विविध चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व सिग्नल लाईट बसविण्यात आल्यानंतर एक वचक निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहराची सुरळीत वाहतूक व्यवस्था आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिसांनाही मदत होईल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.