गोंदिया (Gondia) : केंद्र शासनाच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन या योजनेत नागपूर-हावडा मार्गावरील गोंदिया रेल्वे स्टेशनचा (Gondia Railway Station) समावेश करण्यात आला. रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यासाठी 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेतून आता गोंदिया रेल्वे स्टेशनचा लूक बदलणार आहे.
गोंदिया रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेत समावेश करण्यात यावा, रेल्वे स्टेशनचे सौंदर्यीकरण, रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण, पादचारी पूल, अत्याधुनिक वातानुकूलितसह अनेक महत्त्वाचे कामे करण्यात यावी यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी रेल्वे मंत्रालयासह केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
दरम्यान गोंदिया रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला आहे. खासदार पटेल यांनी सुचविलेल्या 30 कोटी 96 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. परिणामी गोंदिया रेल्वे स्टेशनचा कायापालट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी खासदार पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आभार मानले.
31 कोटी रुपयांच्या निधीतून होणार ही कामे
अमृत भारत योजनेअंतर्गत गोंदिया रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा अनुषगांने खासदार पटेल यांनी सुचविलेल्या कामांना मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण, पाथवे, सौंदर्यीकरण, रंग रंगोटी, वाहन पार्किंगची सोईस्कर व्यवस्था रेल्वे स्थानकाअंतर्गत पादचारी रस्ता, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअर व आधुनिक वाहन, आरक्षण गृह, सीसीटीव्ही, कोच डिस्ले बोर्ड, हायमास्ट लाइट, आधुनिक स्वयंचलित पायऱ्या यासह अनेक कामे करण्यात येणार आहेत.
1878 मध्ये निर्माण झालेल्या गोंदिया रेल्वे स्थानकाचे उद्घाटन 1880 मध्ये झाले होते. 1888 मध्ये स्टेशन सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले. हावडा-नागपूर-मुंबई या मुख्य मार्गावर असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण व्हावे या दृष्टीने रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता, अशी माहिती खासदार सुनील मेंढे यांनी दिली.