Amravati ZP Tendernama
विदर्भ

Amravati ZP : घाईगडबड करूनही 'त्या' 47 कोटींच्या कामांना का लागला ब्रेक?

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने बांधकाम विभागात धावपळ सुरू असून बांधकाम विभागाकडून ४७ कोटींच्या कामांना हिरवी झेंडी देण्यात आली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गातील कामे या निधातून केली जाणार आहेत. विशेष म्हणजे मान्यता देण्यात आली तरी आचारसंहितेमुळे टेंडरप्रक्रिया मात्र खोळंबली आहे. त्यामुळे किमान महिनाभर तरी ही कामे थंडबस्त्यात पडणार आहेत.

जिल्हा परिषद बांधकाम विभागाला २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण भागातील ‘क’वर्ग तीथक्षेत्र विकासाचे १०२ कामांसाठी जवळपास १२ कोटी ३०-५४ लेखाशीर्षाअंतर्गत ग्रामीण मार्गांच्या ८० कामांसाठी २१ कोटी ४५ लाख आणि ५०-५४ या लेखाशीर्षाअंतर्गत इतर जिल्हा मार्गांच्या ३७ कामांसाठी १४ कोटी १४ लाख, असा जवळपास ४७ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड यांनी प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला. त्यामुळे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने ४७ कोटींची कामे खोळंबणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत तरी ही कामे सुरू होण्याची शक्यता नाही.

बांधकाम विभागाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण मार्ग कामासाठी ४७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, मात्र आचारसंहितेमुळे केवळ या कामांचे अंदाजपत्रक, दरपत्रक, तांत्रिक मान्यता ही प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली जाईल. आचारसंहितेनंतर टेंडरप्रक्रिया राबविली जाईल.

- दिनेश गायकवाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद