Amravati ZP Tendernama
विदर्भ

Amravati : रस्ते विकासासाठी 35 कोटींचा ॲक्शन प्लॅन तयार

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून रस्तेक्षेत्रासाठी लेखाशीर्ष 3054 ग्रामीण रस्ते व लेखाशीर्ष 5054 इतर जिल्हा मार्गाचा विकास करणे याअंतर्गत उपलब्ध निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामांसाठी सरकारच्या सूचनाप्रमाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ते विकास व मजबुतीकरणाबाबत सुमारे 35 कोटी 59 लाख रुपयांचे नियोजनाचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. या अनुषंगाने कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड यांनी सात उपविभागाच्या उपअभियंता यांना प्रस्ताव मागविले आहेत.

जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील गतवर्षीचे ग्रामीण रस्ते विकासाचे सुमारे 22 कोटी व इतर जिल्हा रस्ते कामांचे 16 कोटी एवढे दायित्व आहे. सदरचे दायित्व वगळता तालुकानिहाय भौगोलिक क्षेत्राचे आधारावर बांधकाम विभागाने वरील कामांचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार नवीन रस्ते जोडणी 20 टक्के, पूल व मोऱ्यांची जोडणी 15 टक्के आणि मजबुतीकरण व दर्जोन्नती जोडणी 65 टक्के या निकषाप्रमाणे दीडपट नियोजन केले आहे. 

यामध्ये लेखाशीर्ष 5054 मध्ये 14 कोटी 14 लाख, तर 3054 ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकरिता सुमारे 21 कोटी 45 लाख रुपयांची कामे तालुकानिहाय प्रस्तावित केलेली आहे. या नियोजनाप्रमाणे बांधकाम उपविभाग अमरावती क्रमांक 1 व 2 आणि चांदूर रेल्वे, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर, धारणी या उपविभागीय अभियंता यांच्याकडून कामांचे प्रस्ताव मागविले आहेत. सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित केलेल्या कामांना वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचे प्रशासकीय सोपस्कार केले जाणार आहेत. त्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेतून रस्त्यांच्या कामासाठी निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला जाणार आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गाचे कामासाठीचे नियोजन बांधकाम विभागाने केले आहे. या नियोजनानुसार उपविभागाकडून प्रस्ताव आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभाग चे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड यांनी दिली.