Oxygen Plant Tendernama
विदर्भ

Amravati : अमरावती जिल्ह्यातील 15 ऑक्सिजन प्लांट का आहेत बंद? सिलेंडर खरेदीवर कोट्यवधींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : कोरोना काळात रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या आवारात एकूण 16 ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) उभारण्यात आले होते. परंतु, मागील दोन वर्षांपासून यातील फक्त विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील अवघा एकच प्लांट कार्यान्वित आहे. त्यामुळे आजही शासकीय रुगणालयातील रुग्णांना आवश्यक ऑसिजनचा पुरवठा करण्यासाठी दरवर्षी ऑक्सिजन सिलिंडरवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. अशा स्थितीत प्लांटचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला होता. यावेळी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा जीव जाऊ नये, यासाठी सरकार तसेच पीएम केअर फंड तसेच इतर निधीतून प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते.

अमरावती जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयांच्या आवारात 16 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले या सर्व ऑक्सिजन प्लांटची दिवसाला 23.36 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे. परंतु, कोरोनाची लाट ओसरल्यामुळे या ऑक्सिजन प्लांटचा वापरच झालेला नाही. यातील फक्त विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर येथील एकच प्लांट कार्यान्वित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांत आजही बाहेरून ऑक्सिजन सिलिंडरचीच खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसंख्या लक्षात घेता, दररोज 60 ते 70 ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जातो. सुपर स्पेशालिटीमध्येही बाहेरून तेवढ्यात प्रमाणात सिलिंडर बाहेरून मागवावे लागतात. ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांची स्थितीदेखील समान आहे. यंत्रणा उभारली गेली असतानाही त्यावर लाखो रुपयांच खर्च शासनाला करावा लागत आहे.

खासगी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट

कोविडकाळात परतवाडा येथील कृती रुग्णालयात 1.50 मेट्रिक टन, दयासागर रुग्णालयात 0.24 मेट्रिक टन, तर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 0.24 मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले.

'या' ठिकाणी आहेत ऑक्सिजन प्लांट

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय धारणी, उपजिल्हा रुग्णालय तिवसा, ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार, वरुड (पीएचसी बेनोडा), जिल्हा स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय नांदगा खंडेश्वर, ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी, सुपर हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे, उपजिल्हा रुग्णालय मोर्शी, आयुर्वेदिक महाविद्यालय मोझरी, उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर, उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहे.

टेक्निशियनची आवश्यकता

जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. परंतु, हे ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी तसेच त्यांच्या देखभालीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळच रुग्णालय प्रशासनाला मिळालेले नाही. शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाल्यास खासगी रुग्णालयांना देखील येथून ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.