Amravati Tendernama
विदर्भ

Amravati : धक्कादायक; कोट्यवधी रुपयांच्या सेसची कोणी केली चोरी?

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : अंजनगाव सुर्जी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस प्रक्रिया उद्योजक व कापूस व्यापाऱ्यांनी 2016 ते 2022 या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या सेसची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. फसवी आकडेवारी, खोटी कापूस खरेदी दाखवत ही सेस चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.

कापसाच्या खरेदीवरील सेसच्या माध्यमातून अंजनगाव सुर्जी बाजार समितीला दरवर्षी दोन ते अडीच कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होणे अपेक्षित असताना तालुक्याच्या बाजार समितीत स्थानिक कापूस उद्योजकांकडून दरवर्षी लाखात सेस भरणा होत होता.

प्रत्यक्षात झालेली खरेदी व दर्शविलेली खरेदी बोगस आहे आणि यात बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, याचा सुगावा लागल्यावर प्रकरणाचा पाठपुरावा केला असता, 2016 ते 2022 या पाच वर्षाच्या कालखंडात कापूस जिनिंग प्रेसिंग प्रक्रिया उद्योजक व व्यापाऱ्यांनी जीएसटी विभागाकडे कच्च्या कापसावर 36 कोटी 48 लाख 63 हजार 196 रुपये आर. सी. एम.च्या स्वरूपात कर भरल्याचे आढळले, कापूस व्यापाऱ्यांनी या कालखंडात 709972 लाख 63 हजार 920 रुपये किमतीच्या कच्च्या कापसाची खरेदी केली होती.

या व्यवहारापोटी कापूस व्यापाऱ्यांकडून बाजार समितीला 7 कोटी 45 लाख 21 हजार 271 रुपये सेस अपेक्षित होता. परंतु, या व्यापाऱ्यांनी पाच वर्षांमध्ये समितीला 54 लाख 10 हजार 521 रुपयांचा भरणा करत 6 कोटी 92 लाख 10 हजार 750 रुपयांचा सेस दडवल्याचे निष्पन्न झाले. 

विशेष म्हणजे, बाजार समितीमध्ये दरवर्षी लेखापरीक्षण होते. त्यात प्रत्येकवेळी ठपका ठेवला जात असतानाही तत्कालीन समिती प्रशासन व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दखल घेतली गेली नाही. 2023 व 2024 मधील कापूस उद्योजक व्यापाऱ्यांनी बाजार समितीत भरलेला अत्यल्प सेस पाहता, ती रक्कमदेखील एक कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विक्रीकर विभागाच्या आकडेवारीने सेस चोरीच्या शक्यतेला बळकटी आली आहे. याकरिता बाजार समितीचे तत्कालीन सचिव हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. ती रक्कम सव्याज व दंडासह वसूल केली जाईल व बाजार नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अंजनगाव सुर्जी बाजार समितीचे सभापती अॅड. जयंत साबळे यांनी दिली.