Amravati Tendernama
विदर्भ

अजबच! कंटेनरमुक्त शहर अभियान सुरु असतानाच कंटेनर खरेदीसाठी काढले टेंडर?

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : कंटेनरमुक्त शहर ही स्वच्छ भारत मिशनचे पहिले उद्दिष्ट असल्याने कंटेनर खरेदी नकोच, असा पवित्रा घेणाऱ्या मनपा प्रशासनाने आता चक्क 300 कंटेनर खरेदीसाठी नव्याने टेंडर बोलाविले आहेत. त्यावर 2 कोटी खर्च केले जाईल. विशेष म्हणजे यापूर्वी 9 मार्च रोजी काढलेले टेंडर रद्द करून 13 सप्टेंबर रोजी त्यासाठी नव्याने टेंडर काढण्यात आले.

2016 मध्ये घेण्यात आलेले कंटेनर भंगार झाल्याने तत्कालीन आयुक्तांनी यंदाच्या मार्चमध्ये 300 कंटेनर खरेदीसाठी निविदा बोलावली. कंत्राटदार देखील फायनल झाला. दरम्यान 30 जून रोजी डॉ. आष्टीकर निवृत्त झाले. आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी देविदास पवार यांच्याकडे आली. तुटक्या कंटेनरबाबत मोठी ओरड होत असताना त्यावर सव्वा दोन महिने निर्णयच घेण्यात आला नाही. मात्र, ओरड वाढू लागल्याने व कंटेनरशिवाय पर्यायच नसल्याचे पाहून मार्च एप्रिलमध्येच अंतिम झालेले टेंडर रद्द करून 13 सप्टेंबर रोजी नव्याने टेंडर निघाले. आयुक्तांनी जुनी प्रक्रिया रद्द करून नव्याने टेंडर लावण्याचे आदेश दिले.

तत्पूर्वी डीपीसीतून 300 कंटेनर घेण्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाने 9 मार्च रोजी निविदा प्रसिद्ध केली. 67 हजार 266 रुपये प्रतिकंटेनर अशी किंमत निश्चित करण्यात आली. एप्रिलच्या मध्यात पुरवठादार देखील निश्चित करण्यात आला होता. जुन्या टेंडर प्रक्रियेत अंतिम झालेल्या कंत्राटदाराला करारनाम्यासाठी बोलावण्यात आले होते. एप्रिल मे महिन्यात त्याला रिकॉल करण्यात आले. मात्र, तो न आल्याने ते टेंडर रद्द करण्यात आले. 13 सप्टेंबर रोजी नव्याने टेंडर प्रकाशित केले, अशी माहिती बांधकाम विभागाचे अभियंता राजेश आगरकर यांनी दिली.

कंटेनर नसल्यामुळे कचरा खुल्या प्लॉटमध्ये : 

प्रभागातून संकलित कचरा फुटक्या कंटेनरमध्ये वा त्याशेजारी रिकामा केला जातो. त्या कचऱ्यावर डुकरे, कुत्रे फिरलीत की तो कचरा इतरत्र फैलतो. कंटेनर नसलेल्या ठिकाणी तो रस्त्याच्या बाजूला टाकला जातो. कंटेनरच नसल्याने व कलेक्शन सेंटर नसल्याने तो कचरा टाकायचा कुठे, असा सवाल होता. मात्र त्यावर प्रशासनाने अडीच महिने कुठलाही निर्णय घेतला नाही. सबब, फुटक्या कंटेनरमुळे शहरात अस्वच्छता निर्माण झाली होती.