Hospital Tendernama
विदर्भ

Amravati : अखेर 'या' 11 हेक्टर जागेवर होणार 430 खाटांचे रुग्णालय

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न 430 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी अखेर आवश्यक जागा निश्चित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने जागा निश्चित केली आहे. त्यानुसार मौजा आलियाबाद कोंडेश्वर (वडद) येथील 11.29 हेक्टर ई-क्लास जागेबाबत सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही जमीन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय महाविद्यालयाला निःशुल्क हस्तांतरित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालाय मिळावे, यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मागणीला 28 जून 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर 14 जुलै 2023 रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्यावतीने शासननिर्णय जारी करून अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाच्या जागा निश्चितीसाठी उपमुख्यमंत्री (गृह) यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती गठित केली होती. तसेच तात्पुरत्या स्वरूपात 7 वर्षांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व आवश्यकतेनुसार इतर शासकीय रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली होती.

त्याअनुषंगाने अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा यांनी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश सुरू होण्याच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर रुग्णालय परिसरातील जागा देखील निश्चित करून तसा अर्ज देखील 17 सप्टेंबर 2023 रोजी 'एनएमसी'कडे सादर केला होता.

आता कायमस्वरुपी वैद्यकीय - इमारतीसाठी देखील जागा समितीने निश्चित केली आहे. त्यासंदर्भातील शासननिर्णय 5 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने जारी केला आहे. त्यानुसार मौजा आलियाबाद कोंडेश्वर (वडद) येथील 11.29 हेक्टर आर ई-क्लास जागेला शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही जमीन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या घडामोडीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

लवकरच होणार पदभरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न 440 खाटांच्या रुग्णालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, डफरीन व सुपर हॉस्पिटल येथील जागा निश्चित केली आहे. त्यामुळे लवकरच आवश्यक मनुष्यबळाच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदभरती देखील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.