school uniform Tendernama
विदर्भ

Amravati : शाळा सुरू होऊन 2 महिने झाले तरी गणवेशचा पत्ता नाही! कधी मिळणार गणवेश?

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : 'एक राज्य, एक गणवेश' या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना राज्यसरकार कडून गणवेश मिळणार होते. परंतु शाळा सुरू होऊन दोन महिने झाले आणि ऑगस्ट सुद्धा सुरू झाला तरी अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. आता विद्यार्थी सुद्धा गणवेश कधी मिळणार याची विचारणा करीत आहेत. 

अशातच आतापर्यंत केवळ स्काऊट-गाइडच्या गणवेशाचे कापड आले आहे. मात्र, शालेय गणवेशाचा अद्यापही ठावठिकाणा नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षक वैतागले आहेत. सध्या शालेय गणवेशाच्या दोनपैकी स्काऊट-गाइडच्या ड्रेसचे कापड आले. गटस्तरावर वाटप झाले. मात्र, या कापडाची कटाई कशी करायची, हा नवीन प्रश्न शाळांसमोर उभा आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी 'एक राज्य-एक गणवेश' या धोरणाचा अवलंब करण्याचे निश्चित केले. त्यानुसार समग्र शिक्षा अंतर्गत चालू वर्षीच्या शैक्षणिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये 1 ली ते 8 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोफत गणवेश उपलब्ध करून देण्याची घोषणा मोठा गाजावाजा करीत करण्यात आली. मात्र, यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता महिना लोटला आहे

आतापर्यंत अमरावती जिल्ह्यात 14 तालुक्यांतील 1 हजार 668 शाळांतील 1 लाख 20 हजार 574 विद्यार्थ्यांना शासनाकडून स्काऊट-गाइड दुसऱ्या गणवेशाचे कापड शिक्षण विभागाला प्राप्त झाले. मात्र, सरसकट कापड असल्याने कटाई कशी करायची, याबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे शालेय विद्यार्थ्यांना मात्र शालेय गणवेशाची प्रतीक्षा कायम आहे.

विशेष म्हणजे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होवून महिन्याभराचा कालावधी लोटून गेला आहे. दुसरीकडे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही जवळ आला आहे. असे असतानाही विद्यार्थ्यान शालेय गणवेश मिळाला नाही.

दुसऱ्या गणवेशासाठी कापड आले : 

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दोन्ही गणवेशाची जबाबदारी सुरुवातीला महिला आर्थिक विकास महामंडळाकडे देण्यात आली. मात्र, झालेल्या गोंधळामुळे एक गणवेश या मंडळाकडे आणि दुसऱ्या गणवेशाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे दिली. त्यासाठी 1668 शाळांतील 1 लाख 20 हजार 574 विद्यार्थी पात्र आहेत. त्यानुसार स्काऊट- गाइडच्या गणवेशाचा सरसकट कापड आले तसे तालुक्याला पोहोचते केले. मात्र, कापड कटिंग करून, त्याचे शाळास्तरावर वितरण त्यानंतर ते कोणाकडून शिवून करून घ्यायचे, अशा अडचणी आहेत.

समग्र शिक्षा अंतर्गत गटस्तरावर प्राप्त स्काउट-गाइड गणवेश कापडाचे वितरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने वरिष्ठ स्तरावर मार्गदर्शन मागविले आहे. यावर अद्याप मार्गदर्शन अप्राप्त आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी दिली.