Land Scam Tendernama
विदर्भ

Amravati : कोट्यवधींच्या जमिनीचे बनावट स्वाक्षरी आदेशाने फेरफार; तहसीलदारांनीच केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : अमरावती शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या अत्यंत मोक्याच्या तीन जागांचे बनावट स्वाक्षरीने फेरफार झाल्याची धक्कादायक बाब थेट अमरावती तहसीलदारांच्या लक्षात आली आहे. कोट्यवधींच्या जमिनी गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणे आणि शासनाचा लाखोंचा महसूल बुडविल्याचा डाव रचल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशीसुद्धा सुरू केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या तक्रारीनुसार अर्जदाराने नवसारी येथील शेतीचा फेरफार घेण्याकरिता विनंती अर्ज अमरावती तहसील कार्यालयाकडे केल्याची नोंद आहे. यासोबत लागणारी इतर कागदपत्रेसुद्धा तहसील कार्यालयाकडे पुरविण्यात आल्याची नोंद आहे. त्यामुळे संबंधित पटवाऱ्यांनी याची नोंद घेऊन त्यांचा फेरफार देण्यात यावा, असा आदेश 31 मे 2023 रोजी तहसील कार्यालयाकडून काढण्यात आला. तो ऑगस्टमध्ये तहसीलदार यांना माहिती पडताच हा आदेश बनावट असल्याचे लक्षात आले.

अमरावतीचे तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांची बदली 1 जून 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यलयात सामान्य प्रशासन ठिकाणी तहसीलदार या पदावर झाली. बदली जर मे महिन्यात झाली तर फेरफारचा आदेश 31 मे रोजीचा कसा याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

काय आहे प्रकरण?

अमरावती तहसील कार्यालयातून 31 मे 2023 रोजी रहाटगाव येथील एका शेतजमिनीचा फेरफार घेण्याचा आदेश निघाला होता. तो संबंधित कर्मचाऱ्यांना ऑगस्टमध्ये प्राप्त झाला. मात्र तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांना तो आदेश माहिती पडताच मी असा आदेश कधी काढलाच नाही. शिवाय ही स्वाक्षरीसुद्धा बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी केली आहे. माझ्या कार्यकाळात या प्रकारचा कुठलाच आदेश पारित केला नाही, शिवाय सदर आदेशावर माझी बनावट स्वाक्षरी असल्याचे या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे.

अमरावती तहसील कार्यालयातील 'तो' फेरफार आदेश प्रकरण हे बनावट स्वाक्षरी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नवसारी येथील निघालेले फेरफारचे आदेश हे बनावट स्वाक्षरीचे असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील, अशी माहिती अमरावतीचे तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.