Tendernama
विदर्भ

Amravati : नांदगाव पेठ एमआयडीसीतील 'हा' कारखाना होणार बंद; कारण...

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : नजीकच्या नांदगाव पेठ एमआयडीसीच्या (MIDC) अतिरिक्त मिडसी औद्योगिक क्षेत्रात प्लॉट क्रमांक ए-81 या भूखंडावर विनापरवानगीने सुरू असलेला कॅल्शियम नायट्रेट (केमिकल) उत्पादन कारखाना बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 18 जानेवारी 2024 रोजी जारी केले आहेत. त्यामुळे सावर्डी येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मानला जात आहे.

एमआयडीसीच्या नोंदी हा नियमबाह्य कारखाना राजकुमार ऑइल रिफायनरीच्या नावे आहे. मात्र, या ठिकाणी परवाना न घेता अवैधपणे कॅल्शियम नायट्रेट (केमिकल) उत्पादन करण्यात येत असल्याचे यापूर्वी समोर आणले. या गंभीर प्रकाराची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली आहे.

कॅल्शियम नायट्रेटचे उत्पादन हे मनुष्यासाठी घातक असल्याचे तक्रारीत म्हटले होते. सावर्डी येथील गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार, राजकुमार ऑइल रिफायनरीच्या नावे भूखंड असला तरी नाथद्वारा केमिकल, नागपूर हे गेल्या वर्षांपासून विनापरवाना सुरू आहे. या ठिकाणी धूर उंचावर सोडण्यासाठी चिमणीसारख्या कोणत्याही अनिवार्य बाबी नाहीत. या बाबी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आल्या आहेत.

केमिकलचा धूर मानवासाठी धोकादायक

कॅल्शियम नायट्रेट हा धूर मानवासह प्राणी आणि वनस्पतींसाठी खूप धोकादायक ठरणारा आहे. कंपनीच्या परिसरात आणि जवळपासच्या परिसरात वनस्पतींची वाढ होत नाही. धुराच्या समस्येबाबत सावडी येथील गावकरी, दूध व्यावसायिकांच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा धूर जास्त काळ राहतो आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो. म्हणूनच धुराची चिमणी अनिवार्य आहे, असे तक्रारीत नमूद होते.

तक्रारीच्या अनुषंगाने कारखाना बंदचे आदेश जारी केले. घटनास्थळी चमूने पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. निरीक्षकांच्या अहवालाच्या आधारे नांदगाव पेठ एमआयडीसीत हे आदेश दिले आहेत. पण त्यानंतरही हा कारखाना सुरू असल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ अमरावतीचे प्रादेशिक अधिकारी संजय पाटील यांनी दिली.