Amravati ZP Tendernama
विदर्भ

Amravati : अमरावती झेडपीत लवकरच टेंडरचा धडाका! 'या' लगीन घाईचे कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता लक्षात घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सुमारे 32 कोटींच्या कामासाठी अंदाजपत्रक आणि टेंडर प्रक्रियेची धावपळ सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला 2023-24 या आर्थिक वर्षातील सुमारे 32 कोटी 55 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळाला आहे. त्यामुळे आता बांधकाम विभागाने प्राकलन (अंदाजपत्रक) तसेच टेंडरची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत विविध कामांचे टेंडर मागविण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या टेंडरमध्ये साधारणपणे अंतिम प्रक्रियेनंतर 25 फेब्रुवारीपूर्वी वर्क ऑर्डर देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, 25 फेब्रुवारीनंतर केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. जिल्हाधिकारी कार्यालयाने अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या आहेत, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीचा आढावा घेऊन विविध कामांसाठी प्राप्त निधीच्या अनुषंगाने आर्थिक तरतूद असलेल्या कामांचे अंदाजपत्रक तसेच टेंडर व वर्कऑर्डर 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सुमारे 32 कोटींच्या विविध कामांसाठी अंदाजपत्रक व टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत टेंडर धडाका सुरू होणार आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून बांधकामच्या टेंडर सेल विभागात टेंडरसाठी लगीनघाई सुरू आहे.

ही कामे लागणार मार्गी :

जिल्ह्यातील नव्या अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग, क वर्ग तीर्थक्षेत्र, शाळा दुरुस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम अशा प्रकारची विविध कामे उपलब्ध निधीमधून आगामी कालावधीत केली जाणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता व मार्च अखेर जवळ येत आहे. त्यामुळे नुकताच बांधकाम विभागाला डीपीसीकडून जो निधी उपलब्ध झाला आहे, त्याअनुषंगाने बांधकाम विभागाने अंदाजपत्रकांची प्राकलन व टेंडरची प्रक्रिया सुरू केलेली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड यांनी दिली.