Akola

 

Tendernama

विदर्भ

अकोला जिल्हा प्रशासन १५ दिवसांत ९७ कोटी कसे खर्च करणार?

टेंडरनामा ब्युरो

अकोला (Akola) : अकोला जिल्ह्यात (Akola District) विविध विकास कामे करण्यासाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी नियोजन विभागाला मिळालेल्या १८५ कोटी रुपयांच्या निधीपैकी आतापर्यंत विकास कामांवर केवळ ८७ कोटी ८६ लाख रुपयेच खर्च होऊ शकले आहेत. त्यामुळे आर्थिक वर्ष संपायला जेमतेम १५ दिवस शिल्लक असतानाच प्रशासनासमोर ९७ कोटी १३ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. प्राप्त निधीपैकी विविध शासकीय यंत्रणांना १३१ कोटी ८३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून, प्राप्त निधीचा उपयोग न झाल्यास प्रशासनावर निधी परत जाण्याची नामुष्की ओढावू शकते.

जिल्हा वार्षिक योजने (सर्वसाधारण) अंतर्गत सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याला विकास कामे करण्यासाठी निधी मिळताे. या संपूर्ण निधीचे नियोजन, वितरण व खर्च करून घेण्याची जबाबदारी जिल्हा नियोजन कार्यालय अर्थातच जिल्हाधिकारी कार्यालयाची असते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक याेजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध प्रकारची विकास कामे करण्यासाठी सरकारने जिल्हा नियाेजन समितीला १८५ काेटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील संपूर्ण निधी नियाेजन विभागाला प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी बहुतांश रकमेच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे. तर नियाेजन विभागाने विकास कामांसाठी आतापर्यंत एकूण १३१ काेटी ८३ लाख रुपयांचे वाटप संबंंधित शासकीय यंत्रणांना केले आहे. त्यापैकी ८७ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च सुद्धा करण्यात आला आहे. परंतु निधी खर्चाची गती कमी असल्यामुळे व आर्थिक वर्ष संपायला जेमतेम काही दिवस शिल्लक असल्याने कमी वेळेत निधी खर्चाचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

निधी खर्चावर दृष्टिक्षेप

- जिल्हा वार्षिक याेजना - १८५ काेटी

- मिळालेला निधी - १८५ काेटी

- यंत्रणांना वाटप - १३१ काेटी ८३ लाख

- खर्च - ८७ कोटी ८६ लाख

- शिल्लक निधी - ९७ कोटी १३ लाख

कोरोनाचे ग्रहण सुटले

गत दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने राज्यासह अकोला जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने जिल्हा वार्षिक योजनेला सुद्धा कोरोनाचे ग्रहण लागले होते. त्यामुळेच जिल्हा वार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षी मंजूर निधीच्या केवळ ३३ टक्केच निधी देण्याचे सरकारने जाहीर केले होते. यासोबतच सलग दोन वर्ष २५ टक्के निधी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सुद्धा राखीव ठेवला होता. त्यामुळे विकास कामे काही प्रमाणात प्रभावित झाली होती. दरम्यान या आर्थिक वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा न राहिल्याने जिल्हा वार्षिक योजनेवरील कोरोनाचे ग्रहण सुद्धा सुटले आहे.

अकोला जिल्हा वार्षिक योजनेसाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १८५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ८७ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च झाला असून, उर्वरीत निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी खर्च होईल. त्यासाठी नियोजन झाले असून, निधी खर्चाचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे.

- गिरीश शास्त्री, जिल्हा नियोजन अधिकारी, अकोला