akola Tendernama
विदर्भ

Akola : महापालिकेने का गुंडाळला व्हीएनआयटीचा अहवाल? 5 वर्षांपासून सिमेंट रस्त्यांची दुरुस्तीच नाही

टेंडरनामा ब्युरो

अकोला (Akola) : अकोला शहरातील मुख्य चार सिमेंट रस्ते निकृष्ट असल्याचे व्हीएनआयटीने शिक्कामोर्तब केल्यानंतरही महापालिकेने पाच वर्षांपासून रस्त्यांची दुरुस्ती केली नाही. खड्ड्यातून वाट काढणाऱ्या सोशीक अकोलेकरांचे प्रचंड हाल होत असताना मनपा प्रशासनाने 'व्हीएनआयटी'चा (VNIT) अहवाल गुंडाळला असून, या प्रकरणातील दोषींवर आजपर्यंतही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

शहरातील मुख्य चार रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्यामुळे 2017 मध्ये 22 कोटींच्या निधीतून सिमेंट रस्त्यांचे निर्माणकार्य करण्यात आले होते. आरआरसी कन्स्ट्रक्शनने रस्त्यांची कामे पूर्ण केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत सिमेंट रस्त्यांना ठिकठिकाणी तडे, भेगा व त्यावर मोठे खड्डे पडल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ पाठपुरावा केल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सिमेंट रस्त्यांची चौकशी व तपासणी करण्यासाठी 'सोशल ऑडिट'चा निर्णय घेतला होता. रस्त्यांचे नमुने तपासल्यानंतर ते अत्यंत दर्जाहीन व निकृष्ट असल्याचे 'सोशल ऑडिट'च्या अहवालात नमूद करण्यात आले होते.

व्हीएनआयटी'च्या अहवालात दडलंय काय?

नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने (VNIT) जुलै 2020 मध्ये रस्त्यांचे नमुने घेतले होते. डिसेंबर 2021 मध्ये व्हीएनआयटीकडून मनपाला अहवाल प्राप्त झाला. या अहवालात जमा केलेल्या नमुन्यांची तपासणी केली असता, चार सिमेंट रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे नमूद केले आहे. काही रस्त्यांवरील भाग पूर्णतः निकृष्ट असल्यामुळे तो भाग काढून त्याठिकाणी बदल करण्याचेही नमूद आहे.

सोशल ऑडिटला खो!

दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सादर केलेला सोशल ऑडिटचा अहवाल गुंडाळत मनपाचे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी 2020 मध्ये रस्ते तपासणीसाठी 'व्हीएनआयटीची नियुक्त्ती केली. या संस्थेने देखील चार सिमेंट रस्ते अत्यंत दर्जाहीन असल्याचा अहवाल मनपाकडे सादर केला. परंतु आजपर्यंत प्रशासनाने ना रस्ते दुरुस्तीचा निर्णय घेतला, ना दोषींवर कारवाई केली, हे येथे उल्लेखनीय.

या रस्त्यांची झाली चाळण

दुर्गा चौक ते अग्रसेन चौक, मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, मालीपुरा ते लकडगंज रस्ता