Akola Tendernama
विदर्भ

Akola : विश्वासघात करू नका; आम्हाला औष्णिक वीज प्रकल्पच हवा! शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा

टेंडरनामा ब्युरो

अकोला (Akola) : पारस औष्णिक वीज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या कसदार जमिनी संपादन करण्यात आल्या आहेत. परंतु आता या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप करत या भागातील औष्णिक प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शेतकरी, गावकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले.

गेल्या सात आठ वर्षांच्या अगोदर पारस येथील शेतकऱ्यांची काळी कसदार व पिकाऊ जमीन सरकारने औष्णिती वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी घेतली होती अशा पद्धतीची नोंदसुद्धा न्यायनिवाड्यात करण्यात आली आहे. सदर जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.

या सरकारच्या या भूमिकेला पारस येथील शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध केला असून, गेल्या दोन महिन्यांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी देऊन लेखी स्वरूपात पाठिंबा दर्शविला आहे.

समितीतर्फे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अशोक एम. अमानकर, भारतीय जनता पक्षाचे  रामदास लांडे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद सदस्य व श्रीकृष्ण इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. त्याचबरोबर हजारोच्या संख्येने शेतकरी, नागरिकांनी सहभाग घेतला. 

सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आल्याने शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटत आहेत. शेतकरी आणि गावकरी यांचा रोजगार बुडणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी पारस येथे सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध करत आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. कॉलनी गेट येथे औष्णिक वीज केंद्र पारसचे मुख्य अभियंता भगत यांनी मोर्चेकरांकडून निवेदन स्वीकारले.