RTMNU Tendernama
विदर्भ

...यासाठी अजित पवारांनी दिला १०७ कोटी रुपये देण्याचा शब्द

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मध्य भारतातील सर्वांत जुने विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ २०२२-२३ हे वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करणार आहे. यानिमित्त विद्यापीठाला कौशल्य, क्रीडा व आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या सोयी सुविधा उभारण्यासाठी १०७ कोटी रुपये हवे आहेत. हा निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यापीठाला दिला आहे.

शताब्दी वर्षानिमित्त नागपूर विद्यापीठाने टेक्नॉलॉजी ॲण्ड एनर्जी पार्क, तांत्रिक कौशल्य विकास केंद्र, जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकूल, प्राचीन इतिहास आणि पुरातत्व संग्रहालय, तसेच गोंडी व इतर आदिवासी भाषा अध्यासन केंद्र, राजे बख्त बुलंदशाह केंद्र उभारण्याचा संकल्प सोडला आहे.

अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी विभागनिहाय बैठका घेतल्या होत्या. नागपूर विभागीय आयुक्तालात झालेल्या बैठकीत त्यांनी विद्यापीठाला शंभर कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात याचा उल्लेख तसेच तरतूदसुद्धा करण्यात आली नाही. विदर्भातील अनेक आमदारांनी याबाबत नाराजीसुद्धा दर्शविली होती. नागपूर विभागाचे पदविधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थिती करून याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.

दोन दिवसांपूर्वी अभिजित वंजारी आणि नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय समांत यांची भेट घेतली. त्यांना १०७ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. त्यात केली जाणारी कामे आणि त्यावर होणारा खर्च याचा सविस्तर तपशील जोडला आहे. पावसाळी अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या पुरवणी बजेटमधून निधी देण्यात येईल, असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.

असा आहे प्रस्ताव...
- टेक्नॉलॉजी अॅंड एनर्जी पार्क : ३१.५८ कोटी
- तांत्रिक कौशल्य विकास केंद्र : २६.९५ कोटी
- जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकूल : ३०.२७ कोटी
- जनतेकरिता प्राचीन इतिहास आणि पुरातत्व संग्रहालय : ४.२७ कोटी
- गोंडी व इतर आदिवासी भाषा अध्यासन केंद्र आणि राजे बख्त बुलंदशाह केंद्र छ १३ कोटी