नागपूर (Nagpur) : अजनी रेल्वे स्थानकाला (Ajani Railway Station) वर्ल्ड क्लास स्टेशन बनवण्यासाठी रेल्वे लँड डेव्हलपमेंट ऑथेरिटीने (RLDA) ठेकेदाराकडून प्रस्ताव मागितले आहेत. या अंतर्गत ३०१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
अजनी रेल्वे स्थाकावरील इमारत, प्लॅटफॉर्मला आधुनिक केले जाणार आहेत. या शिवाय प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या जाणार आहेत. स्थानकावर जागा पुरेशी नाही, त्यासाठी मागच्या बाजूने आणखी एक रस्ता काढला जाणार आहे. त्यामुळे गाडी आल्यावर निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. त्याच बरोबर पूर्व आणि पश्चिम नागपुरातील प्रवाशांची सोय होणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ४४ एकर जागेत अजनी इंटर मॉडेल हब विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यासाठी या परिसरातील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करावी लागणार होती.
यास पर्यावरण वाद्यांनी विरोध केला होता. सुमारे ५ हजार झाडांची आम्ही कत्तल होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. न्यायालायतही याचिका दाखल केली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांचाही या प्रकल्पास विरोध होता. गडकरी विरोधकही छुप्या पद्धतीने विरोध करीत होते. त्यामुळे गडकरी यांनी या प्रकल्पातील आपला सहभाग काढून घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रकल्पाचे टेंडर रद्द केले होते.
त्यानंतर रेल्वे प्राधिकारणाने वर्ल्ड क्लास स्टेशनचे काम हाती घेतले आहे. या करिता प्री बीड मिटींग घेतली. त्यात इच्छुक ठेकेदारांना आमंत्रित केले. कामाचे स्वरूप सांगितले. त्यानंतर ३०१.५० कोटींचे प्रस्ताव मागितले आहेत. छाननी केल्यानंतर टेंडर दिले जाणार आहे. रॅल्वेने या परिसरात असलेली हिरवळ कायम ठेवून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायी मार्ग काढण्यासाठी काही जुने झालेले क्वार्टर मात्र तोडले जाणार असल्याचे समजते.