नागपूर (Nagpur) : सरकारतर्फे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा दावा केला जातो, मात्र वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. नागपूर जिल्ह्यात अधिकारी ते कर्मचारी अशी 877 पदे मंजूर असून त्यापैकी केवळ 465 पदे भरण्यात आली आहेत. 412 जागा अजूनही रिक्त आहेत म्हणजेच 47 टक्के पदे वर्षानुवर्षांपासून रिक्त आहेत. नागपूर दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी रिक्त पदे लवकरच भरण्याची घोषणा केली होती, मात्र प्रशासकीय पातळीवर त्याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही.
नागपूर जिल्ह्यातील कृषी विभागावर नजर टाकली तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, उपसंचालक, तहसील कृषी अधिकारी, तांत्रिक अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी सहायक, लेखाधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी, अतांत्रिक कर्मचाऱ्यांपासून ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंतच्या मंजूर पदांची मोठी यादी आहे. अधिकारी ते चतुर्थ श्रेणीपर्यंत एकूण 877 पदे मंजूर आहेत, मात्र केवळ 465 पदे कार्यरत आहेत. मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अनेकदा नैसर्गिक समस्या येत असते, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे पिकांची नासाडी होते. वेळेवर पंचनामा तयार केल्यास नुकसानीचे योग्य मूल्यांकन करता येईल. पण 47 टक्के रिक्त पदांमुळे पंचनामा करण्यासाठी पुरेसे अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. तांत्रिक व अतांत्रिक दोषांमुळे शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहतो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे केवळ स्वप्नच राहिले आहे.
रिक्त पदांची स्थिती
उविक्रिया. उपसंचालक - मंजूर पद 5, रिक्त - 4 , तालुका कृषी अधिकारी मंजूर पद 22 आणि रिक्त 11, कृषी सेवक मंजूर पद - 47, कार्यरत 33, रिक्त 14, कृषी पर्यवेक्षक मंजूर पद 88, रिक्त 28, कृषी सहाय्यक मंजूर पद 359 व रिक्त 130, गैरतांत्रिक मंजूर पद 195 रिक्त 100, चतुर्तश्रेणी मंजूर पद 158, रिक्त 125