Adani Tendernama
विदर्भ

Nagpur : अदानींनी रेल्वेसोबत केला करार; बनविणार 100 एकरात 'कार्गो टर्मिनल'

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विविध क्षेत्रात आपले प्रस्थ निर्माण करणाऱ्या अदानी समुहाने आता रेल्वेच्या मालवाहतूक क्षेत्रातही शिरकाव केला आहे. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराजवळील बोरखेडी येथे अदानी समूहाचे 'कार्गो टर्मिनल' विकसित करण्यात येणार आहे. त्याकरिता मध्य रेल्वे आणि अदानी समूह यांच्यात करार झाला आहे.

उद्योगातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी रेल्वेने 'गतीशक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल (जीसीटी)' धोरण आखले आहे. त्यानुसार खासगी कंपन्यांना रेल्वेच्या जागेवर 'जीसीटी' विकसित करण्याची मुभा दिली जाते. नागपूर येथे कंटेनर वाहतूक हाताळण्यासाठी 'मेसर्स अदानी लॉजिस्टिक लिमिटेड' कार्गो टर्मिनल विकसित करणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी केली. विभागातील हे चौथे गतीशक्ती कार्गो टर्मिनल (जीसीटी) आहे. यापूर्वी एमपी बिर्ला सिमेंट, मुकुटबन, नागपूर एमएमएलपी, सिंदी आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, कळमेश्वर असे तीन जीसीटी विकसित करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेने 100 गतीशक्ती टर्मिनल्स विकसित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सध्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार वेगवेगळ्या राज्यांत 60 टर्मिनल्स आधीच कार्यरत आहेत आणि उर्वरित 4 मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये आसनसोल रेल्वे विभागाने देशातील पहिल्या टर्मिनलचे काम सुरू केले होते. 'जीसीटी' धोरण भारतीय रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यास मदत करते. त्यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

बोरखेडीचा कार्गो टर्मिनलला रेल्वेचे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत आणि हा टर्मिनल 100 एकर परिसरात असेल. यातून खासगी कंपन्यांच्या मालाची ने-आण केली जाईल. यामुळे रेल्वे तसेच अदानी समुह यांना फायदा तर होईलच शिवाय टर्मिनलच्या माध्यमातून विदर्भ आणि संपूर्ण देशात मालवाहतूक करणे सोयीचे होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. "कंटेनर वाहतूक हाताळण्यासाठी बोरखेडी येथे कार्गो टर्मिनल विकसित करण्याबाबत मध्य रेल्वे आणि अदानी समूहात करार झाला आहे. जीसीटी लॉजिस्टिक व्यवसाय वाढवेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी अधिक महसूल निर्माण करेल." -अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे" हे टर्मिनल अद्यायावत झाल्याने कार्यक्षमता वाढेल. येथे मे महिन्यात 30 (रेक) आणि जूनमध्ये 35 मालगाड्यांची पूर्ण क्षमतेने मालवाहतूक केली जाणे अपेक्षित आहे. तसेच येत्या काही महिन्यांत त्यात आणखी वाढ होईल. अशी माहिती अदानी लॉजिस्टिक, बोरखेडी चे टर्मिनल प्रमुख निवृत्ती बच्छाव यांनी दिली.