नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेतील (Nagpur Municipal Coporation) वादग्रस्त, तसेच निलंबित डॉक्टर प्रवीण गंटावर (Pravin Gantawar) यांनी एका बँकेलाही बुडवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीएनबी हाऊसिंग लिमिटेडने त्यांचा बैधनाथ चौकातील एक भूखंड जप्त केला आहे. या भूखंडावर एक बहुमजली इमारत उभी केली जाणार आहे.
डॉ. प्रवीण गंटावर यांनी २०१८ मध्ये पीएनबी हाऊसिंग लिमिटेडकडून १० कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले होते. परंतु त्यांनी काही काळ हफ्ते भरल्यानंतर कर्जाची परतफेड केली नाही. बॅंकेने त्यांना वारंवार नोटीस पाठवली. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने १७ जून २०१९ रोजी त्यांचे खाते एनपीए केले. त्यानंतर पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असतानाच कोविडचे आगमन झाले. त्यामुळे कारवाईची प्रक्रिया रखडली. अखेर प्रकरण कोर्टात गेले. जिल्हा न्यायालयाने २५ मार्च २०२२ रोजी त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. अखेर आज त्यांचा बैद्यनाथ चौकातील १० हजार चौरस फूटाचा भूखंड पीएनबी हाऊसिंगने जप्त केला. ही कारवाई पीएनबी हाऊसिंगचे वसुली व्यवस्थापक रोशन पाटील, शाखा वसुली अधिकारी मंगेश जनबंधू, विधी अधिकारी मंगेश मोरघडे यांच्या मार्गदर्शनात गार्डीयन एनफोर्समेंट एजन्सीने केली.
गंटावार महापालिकेत नोकरीवर असताना अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर होते. एक बड्या इस्पितळाच्या व्यवस्थापाने त्यांच्या विरोधात तक्रार केली होती. काही वसुलीबाज तथाकथित समाजसेवकांसोबत त्यांचा संपर्क होते. वसुलीबाज मोठमोठ्या इस्पितळांमध्ये एका महिलेला पाठवायचे. तेथे गर्भलिंग परीक्षण केले जाते असे सांगून तक्रारी करायचे. त्यानंतर डॉक्टर गंटावार चौकशीला जायचे आणि तोडपाणी करायचे, असा आरोप त्यांच्यावर आहे. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनीही महापालिकेच्या सभेत गंटावार यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्यानंतर निलंबित करण्याची मागणी केली होती.