नागपूर (Nagpur) : महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर असलेल्या आणि सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल असलेल्या नागपूर महापालिकेचा कारभार वित्त व लेखा अधिकाऱ्यांशिवायच सुरू आहे. त्यामुळे विकास कामांना फटका बसत आहेच, शिवाय कर्मचाऱ्यांचीही भंबेरी उडत आहे. सरकारकडून वित्तीय संबंधाने येणारी पत्रेसुद्धा धूळखात पडून आहेत.
महापालिकेचे प्रमुख वित्त व लेखा अधिकारी विजय कोल्हे निवृत्त झाले आहेत. महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास दोन्ही संस्था मोठ्या असून शहरातील विकासाची लय कायम ठेवण्याची जबाबदारी आहे. विकास कामे करताना आर्थिक बाबी तपासणे, कंत्राटदारांची देयके, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याची जबाबदारीही वित्त व लेखा विभागावर आहे. परंतु महापालिका व नासुप्रची जबाबदारी पेलताना प्रभारी वित्त व लेखा अधिकारी विलिन खडसे यांची चांगलीच दमछाक होत आहे.
केवळ वित्त व लेखा अधिकारीच नव्हे तर स्टेशनरी घोटाळ्यात निलंबित झालेले अकाऊंट ऑफिसर मेश्राम यांची जबाबदारीही कुणाकडे दिलेली नाही. याशिवाय या विभागातून दर महिन्याला सातत्याने अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत आहे. त्यामुळे एकाच अधिकारी, कर्मचाऱ्याकडे अनेक जबाबदाऱ्या आल्याने त्यांचीही तारांबळ उडाली आहे. त्यामुळे महापालिकेचा महत्त्वाचा विभाग सध्या तरी राम भरोसे कारभार सुरू असल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांनी नमुद केले. प्रमुख वित्त व लेखा अधिकारी पूर्णवेळ नसल्याने अडचण आल्यास कुणाला विचारावे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. अनेक विकास कामांची देयके रखडली आहे. याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. राज्य मंत्रीमंडळात शहरातील पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांच्या शहरातील महापालिकेच्या दुरावस्थामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
घोटाळ्यानंतरही गांभीर्य नाही !
महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा स्टेशनरी घोटाळा उघडकीस आला. वित्त व लेखा विभागातील अधिकारी व कर्मचारी, असे तिघांंना निलंबित करण्यात आले. याशिवाय इतर विभागातील अधिकारीही निलंबित आहेत. एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतरही पूर्णवेळ प्रमुख वित्त व लेखा अधिकाऱ्याची नियुक्ती होत नसल्याने प्रशासनाच्या गांभीर्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.