नागपूर (Nagpur) : नागपूर महापालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) ‘आपली बस'ने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जास्त तिकीट शुल्क द्यावे लागणार आहे. महापालिका परिवहन विभागाच्या शुल्क वाढीच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अध्यक्षा व जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मंजुरी दिली. आपली बसच्या भाड्यात तब्बल १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इंधन आणि सुटे भागांच्या वाढत्या किमतींमुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे पालिका परिवहन विभागाच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. महापालिकेने २०१९ मध्ये आपली बस भाड्यात वाढ केली होती. त्यानंतर आता वाढ करण्यात आली. नव्या शुल्कवाढीमुळे आपली बस प्रवासाचे किमान भाडे आता १२ रुपये असेल. आतापर्यंत किमान २ किमी प्रवासाचे भाडे १० रुपये होते. ३० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी भाड्यात १० ते १२ रुपयांची वाढ होणार आहे. लहान मुलांच्या भाड्यातही बदल करण्यात आला आहे. आपली बसमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांचे किमान भाडे ५ रुपयांवरून ६ रुपये करण्यात आले आहे.
ऑटोरिक्षाचेही भाडे वाढले
सध्या ऑटोरिक्षाचे भाडे पहिल्या किमीसाठी १४ रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी ११ रुपये लागतात. जवळपास नऊ वर्षांनंतर शहरातील ऑटो-रिक्षांचे भाडे वाढणार आहे. किमान भाडे सध्याच्या १४ रुपयांवरून १८ रुपये केले जाईल, असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मिनिट्समध्ये नमूद केले आहे. सुधारित भाड्यानुसार, मध्यरात्री ते पहाटे ५ वाजेदरम्यान धावणाऱ्या ऑटोरिक्षा, मंजूर भाडेवाढीच्या २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारू शकतात.
आपली बसचे भाडे
किमी ---- नवीन भाडे (रुपयांत)
०-२ किमी---१२
४-६ किमी---१३
६-८ किमी ---१६
१०-१२ किमी ---२०
१४-१६ किमी ---३४
२०-२२ किमी---४४
२२-२४ किमी---५०
३०-३२ किमी---६३
४०-४२ किमी ---७४
४८-५० किमी---८५