Nagpur ZP Tendernama
विदर्भ

‘तिरंगा’साठी नागपूर जिल्हा परिषदेला ६५ लाख

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. ग्रामीण भागात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून जिल्हा परिषदेला ६५ लाखांचा निधी दिला आहे. जिल्ह्यातील सर्व १३ पंचायत समितीला प्रत्येकी ५ लाख रुपये वितरित करायचा आहे, असे असले तरी मंगळवारपर्यंत हा निधी पोचता करण्यात आला नव्हता.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विभागातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापना आणि घरो-घरी सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. त्यासाठी कर्मचारी, विविध संस्था, संघटनांकडून तिरंगा वितरित करण्यात येत आहे. त्यात शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाने २० जुलैला ६५ लाखांचा निधी जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा केला.

त्याअंतर्गत प्राप्त झालेला निधी सर्वसाधारणपणे कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा आहे, हे ही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात प्रचार प्रसार प्रसिद्ध, चर्चासत्रे, कार्यशाळा, परिसंवाद, शालेय स्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पदयात्रा, मॅरेथॉन, स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार, देशभक्ती, देशप्रेम यांच्याशी निगडित छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम. हा निधी घरोघरी तिरंगासाठी वापरता आला असता. परंतु, बीडीएस झाले नसल्याने जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा असलेला निधी पंचायत समितीवर वर्ग झाला नसल्याची माहिती समोर आली.