Nagpur Tendernama
विदर्भ

नागपूर रेल्वे स्थानकाचे टेंडर अंतिम टप्प्यात; ३५० कोटींच्या कामाला

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाचे करण्याच्या कामाला अखेर मुहूर्त लवकरच सापडणार आहे. सुमारे साडेतीनश कोटींचे टेंडर भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. रेल लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी (आरएलडीए)कडे आलेल्या टेंडरची तांत्रिक पडताळणी झाली असून ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

आरएलडीएकडून निवडलेल्या बोलीदाराला काम करण्याची परवानगी मिळणार आहे. आरएलडीएचे अधिकारी याबाबत अधिकृतरीत्या बोलत नसले तरी प्रत्यक्ष कामाला येत्या काही महिन्यात किंवा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्यवर्ती रेल्वे स्थानक ब्रिटीशकालीन आहे. या स्थानकाच्या बांधकामात लाल दगडाचा उपयोग करण्यात आला. त्यामुळेच रेल्वेस्थानकाचे सौंदर्य आजही कायम आहे. रेल्वे स्थानक हेरिटेज वास्तूंच्या यादीत असल्याने स्थानकाचे जुने स्वरूप कायम राखून जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे मुख्य लाल दगडांच्या हेरिटेज वास्तुचे सौंदर्य अबाधित राहणार आहे. मुख्यतः: हेरिटेज लुक अधोरेखित करण्यासाठी स्थानकाच्या लगतच्या इमारती पाडून आधुनिक सुविधा देण्याची योजना आहे. दररोज येणाऱ्या व जाणाऱ्या लाखो प्रवाशांना सर्वप्रकारच्या सुविधा विकास कामे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

देशातील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकात नागपूर रेल्वे स्थानकाचा उल्लेख होतो. संतरानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये- जा करीत असतात. हावडा-मुंबई आणि दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गांचे जंक्शन आहे. जवळपास २५४ मेल/एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या स्थानकावर थांबतात. महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि व्यस्त स्थानकांपैकी नागपूर स्थानक एक आहे.

स्थानकाची होणार कायापालट
स्थानक पुनर्विकासाच्या या कामात मल्टी मॉडेल इंटिग्रेशन रेल्वेस्थानक, मेट्रो स्थानक आणि मल्टी-लेव्हल कार पार्किंगला जोडणाऱ्या स्कायवॉकच्या माध्यमातून काम होणार आहे. त्याचप्रमाणे स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम भागात डिपार्चर हॉलला जोडणारा एक रूफ प्लाझा बांधण्यात येईल. यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक कॉमन वेटिंग एरिया प्लॅटफार्मच्या वरच्या बाजूला असेल. त्यामुळे प्रवाशांना जाण्यासाठी अडचण होणार नाही. स्थानकाच्या विकासाचे हे मॉडेल भारतीय प्रवाशांना जागतिक स्तरावरील प्रवासाचा अनुभव देणारे ठरेल. तसेच स्टेशनचा पुनर्विकास, नवीन योजना, रेल्वे कॉलनीचा विकास, नवीन बांधकाम आदी कामे या अंतर्गत केली जाणार आहेत.

या कामाची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यात कामाला सुरुवात होईल.
- विजय थूल, मंडल वाणिज्य प्रबंधक व जनसंपर्क अधिकारी (मध्य रेल्वे)