Nagpur Tendernama
विदर्भ

200 कोटींच्या सुशोभीकरणाचे नागपुरात 'वाजले की बारा..!'

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राज्य स्तरावरील स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या स्पर्धेत नागपूर महापालिकेला (NMC) 15 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले असले तरी 'नाम बड़े और दर्शन छोटे' या गाण्याची आठवण तुम्हाला नागपूर शहरात फिरताना तीव्रतेने होईल, अशी परिस्थिती सध्या शहरात दिसते आहे.

G-20 आंतराष्ट्रीय परिषदेसाठी नागपूर शहराला नववधू सारखे सजवण्यात आले होते. ही सजावट 90 टक्के तशीच राहणार म्हणून महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांनी आश्वस्त केले होते. परंतु महिना उलटायच्या अगोदरच सुशोभीकरणाचे तीन तेरा वाजले आहेत. रस्त्यांवर लावलेले रोपटे अस्ताव्यस्त आणि सजावटीचे दिवे बंद पडले आहेत.

महिनाभरापूर्वी नागपूर शहराने G-20 परिषदेचे यजमानपद भूषविले होते. महानगरपालिकेने शहराच्या सुशोभीकरणावर 200 कोटी खर्च केले होते आणि बहुतेक काम कायमस्वरूपी असून, पुढच्या कालावधीसाठी व्यवस्थित ठेवण्याचा दावा केला होता. नागरिकांनीही या कामाचे कौतुक केले होते, तर काहींनी कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह लावत परदेशी पाहुण्यांना प्रभावित करण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा केल्याची टीकाही केली होती. सत्यस्थिती पाहता शहरात सौंदर्यीकरणाच्या नावावर काहीच उरलेले नाही.

परिषद ज्या ठिकाणी होती, त्या वर्धारोडवरील हॉटेल व मिहानच्या परिसरातही लावलेले रोपटे एकतर गायब आहेत किंवा वाईट परिस्थितीत अस्ताव्यस्त पडले आहेत. अशाप्रकारे महापालिकेने करदात्यांचा पैसा व्यस्त केल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्ते करीत आहेत.

सुशोभीकरणाची सर्वाधिक कामे वर्धा रोड, सिव्हिल लाइन्स आणि इतर ठिकाणी झाली आहेत, जिथे परदेशी प्रतिनिधी भेट देणार होते. पथदिव्यांच्या खांबांवर लावलेले अनेक सजावटीचे दिवे काम करत नसल्याचे दिसले. वर्धा रस्त्यावरील सजावटीचे किमान 40 टक्के दिवे बंद होते. दीक्षाभूमीजवळ प्रकाश मालिका वगळता कोणतेही सजावटीचे दिवे कार्यरत नव्हते. मध्यवर्ती कारागृहासमोरील रस्त्यावर, कडेला आणि पदपथांवर ब्लॉक्स पडलेले आढळून आले. या कामांची पाहणी करायला मनपा विसरली आहे असे दिसते.

विशेष म्हणजे कंत्राटदारही याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने कामांची कोणी तपासणी करत नसल्याचे  नुकताच झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे समोर आले आहे. पाणी मिळाल्याने काही झाडे वाचली असावी, पण त्यांच्यामुळे अनेक झाडेही उन्मळून पडली. महापालिकेने प्रमुख रस्ते मोकळे केले असले तरी आतील गल्ल्या अजूनही बाधित आहेत. अनेक रस्त्यांच्या कडेला झाडे आणि फांद्या पडलेल्या आढळल्या. याशिवाय चित्रे किंवा भित्तीचित्रेही अस्वच्छ अवस्थेत आढळून आली.

मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या मते काही झाडे सजावटीची असतात ज्यांचे आयुष्य कमी असते. बहुतेक रोपटे दीर्घकाळ टिकतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. काही झाडे कदाचित मरतील, पण ती बदलली जातील. काही हंगामी झाडे पावसाळ्यात लावली जातील. आम्ही कंत्राटदारांना फक्त 50 टक्के पेमेंट केला आहे आणि बाकीची त्रयस्थ संस्थेच्या तपासणीनंतर केली जाईल. दिवे बंद आहेत. शहरात जोरदार पाऊस पडतोय. जर योग्य वेळी व्यवस्था केली गेली नाही तर उरले सुरले सौंदर्य पण नष्ट होईल.