अकोला (Akola) : शहरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच दळणवळणाचा नवा पर्याय व वाहतूक कोंडीवरील उपाययोजना म्हणून १६३ कोटी खर्च करून शहराच्या मध्यवर्ती भागात उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. आता पुलाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. त्यामुळे उद्घाटन आणि नाव बाजूला ठेऊन नागरिकांना पुलाचा वापर सुरू केला आहे.
अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा व माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजयधोत्रे यांच्यासोबत भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला शहरातील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून अशोक वाटिका चौक ते अकोला क्रिकेट क्लबपर्यंत उड्डाण पुलाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानुसार १६३ कोटी रुपये खर्च करून तीन रॅम्प असलेल्या उड्डाणपुलासह अंडरपासचे निर्माण अकोला शहरात करण्यात आले. केंद्रीय रास्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून चार किलोमीटरचा १२ मीटर रुंद उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल सध्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
शहरातील अशोक वाटिका, बस स्थानक आणि टॉवर चौकातील वाहतूक कोंडीवर पर्याय ठरणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. अशोक वाटिकेकडून टॉवरचौकात व टॉवर चौकातून अशोक वाटिका तसेच नेहरू पार्क चौकाकडे उतरण्यासाठी या उड्डाणपुलावर पर्यायी मार्ग देण्यात आले आहे. अकोला क्रिकेट क्लबपासून थेट जेल चौकापर्यंत या उड्डाणपुलावरून जाता येणार आहे. यातील काही रॅम्प हे सध्या खुले असल्याने नागरिकांनी उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा न करताच पुलावरून वाहतुकीला सुरुवात केली आहे.