Nagpur Tendernama
विदर्भ

अधिकाऱ्यांना वेळ नसल्याने नव्या कोऱ्या 15 इलेक्ट्रिक बसेस पडून

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर स्मार्ट सिटीने (Smart City Nagpur) दिलेल्या टेंडरनुसार टाटा (Tata) कंपनीच्या १५ इलेक्ट्रिक बसेस (E Buses) शहरात उभ्या आहेत. मात्र ५० टक्के रक्कम दिली जात नसल्याने या सर्व बसेस गोदामात धूळ खात पडल्या आहेत. त्या केव्हा धावणार याचे कुठलेही उत्तर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडे नाही.

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पातून २५ इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी १५ बसेसचा पुरवठा टाटा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. टेंडरनुसार पर्चेस ऑर्डवर १० टक्के, इन्स्पेक्शननंतर ४० टक्के रक्कम तर उर्वरित ५० टक्के रक्कम २५ बसेस दाखल झाल्यानंतर कंपनीला स्मार्ट सिटीने द्यायची आहे. १० टक्के रकमेचा ॲडव्हांस दिल्यानंतर मागील आठवड्यात १५ बसेसचा पुरवठा टाटा कंपनीने केला आहे. आता स्मार्ट सिटीला १५ बसेसचे इन्स्पेक्शन करून ४० टक्के रक्कम अदा करायची आहे. मात्र अद्याप एकही अधिकारी बसेसकडे फिरकलेला नाही. त्यामुळे या बसेस पडून आहेत.

या बसेस स्मार्ट सिटीला महापालिकेच्या ताफ्यात द्यायच्या आहेत. महापालिकेने 'आपली बस' नावाची सेवा सुरू केली आहे. याकरिता परिवहन समिती स्थापन केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवकाची निवड केली जाते. सध्या महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपून सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. महापालिकेची सर्व सूत्र प्रशासक राधाकृष्ण बी सांभाळत आहे. अधिकाऱ्यांकडे विचारणा करणारे लोकप्रतिनिधी नसल्याने सर्व कारभार सुस्त झाला आहे.

वास्तविक बसेस आल्यानंतर तत्काळ पडताळणी करणे अपेक्षित होते. ४० टक्के रक्कम देऊन उर्वरित १० बसेस भविष्यात घ्यायच्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडे सध्या वेळच नाही. त्यामुळे नव्या कोऱ्या इलेक्ट्रिक बसेस किती दिवस पडून राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.