Mayo Hospital Nagpur (IGGMCH) Tendernama
विदर्भ

Nagpur : 145 कोटी खर्च करुन तयार होणार 500 बेडचे 'मेडिसिन विंग'

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) 500 बेडची क्षमता असलेला इमर्जंसी मेडिसिन विभाग तयार करण्याचा रखडलेला प्रस्ताव अखेर मंजूर झाला. यासाठी 145 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात रुग्णांना होणार आहे.

मेयोत रुग्णहिताला प्राधान्य देऊन अपघात विभाग आणि सर्जिकल कॉम्प्लेक्स सेवेत दाखल झाले. अद्ययावत शल्यक्रियाग्रहांची सुविधा असलेल्या या इमारती सेवेत रुजू झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय विंग आणि 500 खाटांच्या क्षमतेचे मेडिसिन विंग प्रस्तावित होते. सध्या प्रशासकीय विंगचे बांधकाम सुरू आहे, मात्र मेडिसिन विंगचे बांधकाम चार वर्षांपासून रखडले होते. यामुळे साडेतीन लाख स्क्वेअर फुटातील बांधकाम असलेल्या सात मजल्यांच्या मेडिकल विंगचा नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 

मेडिकल विंगचा खर्च वाढला

मेयोत 77 कोटी खर्च करून सर्जिकल कॉम्प्लेक्स उभारण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील मेडिकल कॉम्प्लेक्स (विंग) साठी 100 कोटीचा खर्च अपेक्षित होता. या खर्चात वाढ होऊन तो आता 199 कोटींवर गेला होता. मात्र नव्याने मंजुरी मिळालेल्या प्रस्तावात 500 खाटांची क्षमता असलेल्या मेडिसिन विंगसाठी 145 कोटी 54 लाख 23 हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे मेयोमध्ये लवकरच मेडिसिन, बालरोग, स्त्री रोग प्रसूती शास्त्र, कॅज्युअल्टी, टीबी, त्वचारोग सारख्या विभागांसाठी अद्ययावत सुविधांनी युक्त प्रत्येकी 30 बेडची सोय होणार आहे.

आयसीयू बेड वाढणार

सध्या मेयोतील रुग्णांसाठी 100 बेडची सोय असलेला अतिदक्षता विभाग सेवेत आहे. यात प्रत्येकी 30 बेडची क्षमता असलेल्या आणखी दोन आयसीयू वॉर्डाची भर पडणार आहे. त्यामुळे मेयोतील आयसीयूच्या खाटा 60 ने वाढणार आहेत. सोबतच नव्याने कार्यान्वित होणाऱ्या इमर्जन्सी मेडिसिन विभागामुळे मेडिसिनच्या 210 बेडमध्ये वाढ होणार आहे.