ZP Bharti Tendernama
उत्तर महाराष्ट्र

ZP Bharti 2023 : ठरले तर! राज्यातील 19 हजार पदांच्या भरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्यातील जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या (ZP Recruitment) नोकरभरतीसाठी प्रक्रिया सुरू असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने थेट भरती प्रक्रिया ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा प्रत्येक संवर्गानिहाय स्वतंत्रपणे होणार आहे. राज्यातील ३५ जिल्हा परिषदांमध्ये सर्वसाधारणपणे १९ हजार पदे भरली जाणार असून, त्यासाठी साधारणपणे १४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया जवळपास अकरा वर्षापूर्वी झाली होती. त्यामुळे मधल्या काळात अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली असून त्यात जिल्हा परिषदांमधील सर्व संवर्गांमधील साधारणपणे १९ हजार पदे भरली जाणारआहेत.

ही भरती रिक्त पदांच्या ८० टक्के जागांसाठी होत आहे. नोकरभरतीसाठी ३ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षेला सुरवात होईल. त्यासाठी आयबीपीएस कंपनीने तयारी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विविध संवर्गांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एक अथवा तीन शिफ्टमध्ये परीक्षा होईल, अशी माहिती देण्यात आली.

या परीक्षेसाठी सर्वसाधारण उमेदवारांकडून एक हजार, मागासवर्गीय उमेदवारांकडून ९०० रुपये आकारण्यात आले आहेत. अर्ज दाखल केल्यावर परीक्षेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा होती. अखेर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सर्व जिल्हा परिषदांतील परीक्षा एकाच वेळी होतील. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी, लघुलेखक, कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांसाठी ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा होणार आहे.

ग्रामसेवक, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या परीक्षा दुसऱ्या टप्प्यात होतील. कनिष्ठ सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षक या पदांबाबतचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

नाशिकला ६४ हजार अर्ज
नाशिक जिल्हा परिषदेत  एक हजार ३८ जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून त्यासाठी ६४ हजार ८० उमेदवारांनी अर्ज केले आहेत.  

असे आहे वेळापत्रक...
 ३ ऑक्टोबर : सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंता
 ४ ऑक्टोबर : तांत्रिक पदासाठी परीक्षा
 ५ ऑक्टोबर : पशुधन पर्यवेक्षक
 ७ ऑक्टोबर : वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
८ ऑक्टोबर : विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
१० ऑक्टोबर : विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक
११ ऑक्टोबर : स्टेनोग्राफर व कनिष्ठ सहाय्यक लेखा