नाशिक (Nashik) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६० (NH-60) अर्थात नाशिक-पुणे (Nashik-Pune) या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी खासगी वाहनांना २११ किमी प्रवासाठी २१० रुपये टोल भरावा लागतो. म्हणजे साधारणपणे एका किलोमीटरसाठी एक रुपया टोल आकारला जातो. एवढा भरमसाठ टोल देऊनही पुणे-नाशिक प्रवासाला सहा तासांचाच वेळ लागतो आहे. रस्त्यांत सुरू असलेली कामे, पावसामुळे पडलेले खड्डे आणि भरमसाठ टोलचा भुर्दंड यामुळे पुणे-नाशिक प्रवास 'नको रे बाबा', अशी प्रवाशी, वाहनचालकांची अवस्था आहे.
आळेफाटा, नारायणगाव, मंचर या ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे; राजगुरूनगर, चाकण येथील वाहतूक कोंडी व पावसाळ्यात या संपूर्ण मार्गावर पडलेले खड्डे यामुळे पुणे-नाशिक प्रवासासाठी सहा तास लागत आहेत. त्यामुळे हा प्रवास म्हणजे विकतचा मनस्ताप ठरत असल्याचा प्रवाशी, वाहनचालकांचा अनुभव आहे.
नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६०च्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१३ मध्ये कामाचे उद्घाटन करण्यात आले. या महामार्गाची उभारणी आठ वर्षांपासून सुरू असून ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. मात्र, सरकारच्या टोल आकारण्याच्या धोरणानुसार या महार्गावरून जाणाऱ्या वाहनांकडून टोलची आकारणी केली जात आहे. नाशिक येथून निघालेल्या वाहन चालकास पुणे येथे पोहोचेपर्यंत २१० रुपये टोल द्यावा लागत आहे. म्हणजे २१० किमी अंतरासाठी २११ रुपये टोल देण्यासही वाहन चालकांची तयारी आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात या रस्त्याचे अर्थवट काम व पावसामुळे संपूर्ण प्रवासात पडलेले खड्डे यामुळे नाशिक-पुणे हा प्रवास अत्यंत त्रासदायक होत आहे.
यापूर्वी नाशिक महापालिका हद्दीतील एक-दीड किलोमीटरच्या कामासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागला. या पावसाळ्यात तो मार्ग पूर्ण होऊन वाहतूक सुरळीत झाली असली तरी त्यापुढचा प्रवास हा पूर्ण खड्ड्यांमधून होत आहे. पुढे सिन्नर घाट ओलांडल्यानंतर सिन्नर बाह्यवळण रस्त्याच्या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे माळेगाव व गुरेवाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे रस्ते खोदून ठेवले आहेत. यामुळे या खोदलेल्या रस्त्यांमधून वाहनांना वाट काढावी लागते. यापुढे पुण्यापर्यंत जाईपर्यंत संपूण रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत.
सततच्या पावसामुळे या खड्ड्यांचा आकार वाढत चालला असून पाऊस सुरू असल्यास त्यात साचणाऱ्या पाण्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे वाहने जोरात आदळत असून वाहनांमध्ये बसलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे या खड्ड्यांमुळे वाहने पंक्चर होणे-नादुरुस्त होण्याचेही प्रकार वाढत आहेत.
चौपदरीकरणाचा फायदा काय?
नारायणगाव, मंचर या भागात महामार्गाचे काम अद्याप सुरू असल्याने तेथेही वाहनांचा वेग कमी होऊन नाशिक-पुणे या २११ किमीच्या प्रवासासाठी सहा तास लागत आहेत. या महामार्गाचे चौपदरीकरण केले नव्हते, तेव्हा ही या प्रवासासाठी सहा तास लागायचे, मग आता टोल भरून व त्याच्या जोडीला खड्ड्यांचा त्रास सोसूनही सहाच तास लागणार असतील, तर त्या चौपदरीकरणाचा काय फायदा, असा प्रश्न वाहनचालांकडून विचारला जात आहे.