Nashik Z P Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक झेडपीच्या 'या' टेंडरला का मिळेना प्रतिसाद? चक्क तिसऱ्यांदा..

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्यात जनावरांमध्ये लम्पी स्किन रोगाची साथ पसरत असल्याने ग्राम विकास विभागाने कंत्राटी पद्धतीने जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असलेल्या पशु संवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत 40 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती पुरवठादार नियुक्तीसाठी टेंडर Tender) प्रक्रिया राबवली आहे. मात्र, दोन वेळा टेंडर मागवूनही केवळ एकच टेंडर आल्यामुळे जिल्हा परिषदेवर (Nashik Z P) तिसऱ्यांदा टेंडर मागवावे लागणार आहे. 

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 339 जनावरांना लम्पी स्किन रोगाची बाधा झाली आहे. त्यात जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात 43 पर्यवेक्षक पदे रिक्त आहेत. या रोगाचा सामना करताना रिक्त पदांचा अडथळा येऊ नये म्हणून ग्रामविकास विभागाने कंत्राटी पदे भरण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने पशुधन पर्यवेक्षक 40 पदांच्या कंत्राटी भरतीसाठी 23 सप्टेंबरला ई टेंडर प्रसिद्ध केले. या टेंडरमध्ये सहभागी होण्याची शेवटची मुदत 30 सप्टेंबर होती. तोपर्यंत केवळ एकच टेंडर आल्याने दुसऱ्यांदा टेंडर मागवण्यात आले. या दुसऱ्या टेंडरची मुदत 6 ऑक्टोबर होती. मात्र, दुसऱ्या टेंडरमध्येही केवळ एकच स्पर्धक सहभागी झाला आहे. यामुळे तिसऱ्यांदा टेंडर मागवण्याची नामुष्की आली आहे. 

नाशिक जिल्ह्यात सध्या लम्पी स्किन रोगाचे 117 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच 75 टक्के पशूंना लसीकरण केले आहे. यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत ही साथ आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत असून तोपर्यंत या कंत्राटी पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तात्पुरती सोय

प्रादेशिक पशु संवर्धन विभागाने मागील वर्षी पशुसंवर्धन अधिकारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यासाठी महाराष्ट्र विकास ग्रुप या कंपनीची पुरवठादार म्हणून नियुक्ती केली होती. या कंपनीची मुदत संपली आहे व त्यातच लम्पी स्किन साथीचा उद्रेक झाला. यामुळे पशुसंवर्धन विभागात अधिकारी कमी पडू नये यासाठी राज्य सरकारने या कंपनीला मुदतवाढ दिली आहे. यामुळे या कंपनीने जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागाला 40 पशुधन पर्यवेक्षक पुरवले आहेत. नवीन पुरवठादार निश्चित होईपर्यंत या अधिकाऱ्यांची सेवा घेतली जाणार आहे.