नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) काही अधिकारी आणि कर्मचारी फायलींमधील गुप्त माहिती ठेकेदारांना (Contractors) पुरवत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांनी खातेप्रमुखांना यासंदर्भात पत्र देत, कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती बाहेर उघड केल्यास संबंधित कर्मचारी, तसेच खातेप्रमुखांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांची महापालिकेपेक्षा ठेकेदारांवर असलेल्या निष्ठेचा मुद्दा समोर आला आहे.
महापालिकेत विविध विकासकामे व धोरणात्मक विषयांचे प्रस्ताव तयार केले जातात. त्यावर संबंधित विभागांचे लिपिक, अधीक्षक, खातेप्रमुख तसेच अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून टिपण्या लिहिल्या जातात. तसेच विकासकामांबाबतचे प्राकलन व व्यवहार्यता तपासणी करताना प्रस्ताव लेखा व वित्त विभाग, लेखा परीक्षण या विभागांकडून अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे जात असतात. या फायलींच्या तपासणीच्या प्रवासादरम्यान काही कर्मचारी व अधिकारी या फायलींमधील माहिती संबंधित ठेकेदारांपर्यंत पोहोचवतात, ही बाब समोर आली आहे. यामुळे खातेप्रमुख तसेच अतिरिक्त आयुक्तांनी केलेली टिप्पणी बाहेर जाऊन संबंधित व्यक्ती या अधिकाऱ्यांना अशी टिपणी का लिहिली म्हणून विचारतात. यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत शंका उपस्थित होत आहे.
याची दखल घेऊन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (सेवा) अशोक आत्राम यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे तंबी दिली आहे. यापुढे कार्यालयीन कामकाजाबाबतची माहिती बाहेरच्या व्यक्तींना दिल्यास संबंधितांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या गंभीर प्रकारावरून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.