UAADAN Nashik-Pune Tendernama
उत्तर महाराष्ट्र

पुणे-नाशिक विमानसेवेचे ग्रहण कधी सुटणार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे-नाशिक विमानसेवा (Pune-Nashik Air Connectivity) अजूनही ‘उडान’च्या (Udaan) प्रतीक्षेत आहे. दोन महिन्यांपासून ही सेवा बंद आहे. विमानतळ प्रशासनाने पुणे-नाशिक विमानसेवेसाठी ‘विंटर शेड्यूल’मध्ये स्लॉट राखीव ठेवल्याचे सांगितले होते. तसेच विमानसेवा सुरू होणार असेही म्हणाले होते. मात्र, पुणे विमानतळाचा ‘विंटर शेड्यूल’ सुरू होऊन सुमारे एक महिना उलटून गेला, पण अद्याप पुणे-नाशिक विमानसेवेचे उडान झालेच नाही. त्यामुळे प्रवाशांकडून देखील आता या विमानसेवेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या संदर्भात विमानतळ प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

काय आहे ‘उडान’?
- सामान्य नागरिकांना विमानाने प्रवास करता यावा यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून 'उडे देश का आम नागरिक' (उडान) ही योजना सुरू
- यात पुण्याहून नाशिक व बेळगावसाठी आठवड्यांतून पाच दिवस सेवा

सेवा का बंद?
- सरकारने प्रवाशांच्या तिकिटावरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने २८ ऑक्टोबरपासून ही विमानसेवा बंद
- केवळ पुणेकरांनाच नाही तर चार राज्यांतील शहरांतील प्रवाशांना याचा फटका

संभ्रमावस्था कायम
पुणे-नाशिक विमानसेवेचे २८ ऑक्टोबर रोजी शेवटचे उडान झाले. त्यावेळी हवाई वाहतूक मंत्रालयाने अनुदान बंद केल्याने ही विमानसेवा थांबवीत असल्याची चर्चा होती. नोव्हेंबर महिन्यात मात्र पुणे विमानतळ प्रशासनाने तांत्रिक कारणामुळे ही विमानसेवा बंद झाली असल्याचे सांगून ‘विंटर शेड्यूल’मध्ये विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले. मात्र, अजूनही विमानसेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे उर्वरित दोन महिन्यांत तरी ही विमानसेवा सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुणे-नाशिक विमानसेवा बंद झाल्याने केवळ पुणेच नाहीतर नाशिकच्या प्रवाशांना देखील मोठा फटका बसला आहे. विमानसेवा सुरू व्हावी म्हणून हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. विमानतळ प्रशासनाने या बाबतचा निर्णय जाहीर करणे गरजेचे आहे. त्यामुळे सेवेविषयी स्पष्टता येईल.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ, पुणे