Nashik Municipal Corporation. Tendernama
उत्तर महाराष्ट्र

काय आहे 'इंदूर पॅटर्न'? नाशिक महापालिकेला हे शिवधनुष्य झेपणार का?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातील (Swachh Bharat Mission) स्वच्छ शहर स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी नाशिकची घसरगुंडी झाल्यानंतर नाशिक महापालिकेने स्वच्छ शहर स्पर्धेत देशात पहिला क्रमांक पटकावून स्वच्छतेचा सप्ततारांकित दर्जा मिळालेल्या इंदूरचे (Indore) अनुकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहरात यापुढे केवळ ओला व सुका कचरा असे विलगीकरण करण्याऐवजी इंदूरप्रमाणे कचऱ्याचे पाच प्रकारांमध्ये विलगीकरण करावे लागणार आहे. इंदूर शहराने स्वच्छतेचा सप्ततारंकित दर्जा प्राप्त केल्यानंतर नाशिक महापालिकेला स्वच्छतेचे हे शिवधनुष्य पेलणार का, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत स्पर्धेतील स्वच्छ शहर २०२२ स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर केला आहे. या स्पर्धेत नाशिक शहराचा क्रमांक मागील वर्षाच्या १७ वरून २० वर घसरला आहे. यामुळे नाशिक महापालिकतर्फे शहर स्वच्छतेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांतील फोलपणा समोर आला आहे. नाशिक शहराचे हवामान वर्षभर आल्हादायक असल्यामुळे येथे स्थायिक होण्याचा लोकांचा कल असतो. तसेच दर - बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे येथे पायाभूत सुविधांचा विकास होण्यासाठी मोठ्याप्रमाणावर निधी मिळत असतो. मात्र, स्वच्छतेच्या निकषांमध्ये नाशिकची घसरगुंडी होत असल्यामुळे हा टीकेचा विषय ठरत आहे. यामुळे स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी नाशिक शहराची स्वच्छता वाढवण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.

पहिल्या टप्प्यात त्यांनी दसऱ्यापासून कचऱ्याचे पाच प्रकारात विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी महापालिका कर्मचाऱ्यांपासून होणार आहे. यामुळे लवकरच नागरिकांना ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक कचरा, नॉन प्लॅस्टिक व घातक कचरा याप्रमाणे विलगीकरण करावे लागणार असून घंटागाड्यांमध्येही या पाच प्रकारच्या कचऱ्यांसाठी वेगवेगळे कप्पे असणार आहेत, असेही आयुक्तांनी सूचित केले आहे. आयुक्तांनी पाच प्रकारांत कचरा विलगीकरण करण्याचा घेतलेला निर्णय या आधीच इंदूर महापालिकेकडून राबवला जात आहे. यामुळे नाशिकमध्ये इंदूर पॅटर्न राबवून नाशिक महापालिका स्वच्छतेत प्रगती करणार आहे.

असा आहे इंदूर पॅटर्न...
देशात २०१६ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात इंदूर हे २५ व्या क्रमांकावर होते. त्यानंतर सलग सहावेळा या शहराने भारतातील सर्वात स्वच्छ शहर हा मान पटकावला आहे. प्रगतीचा टप्पा गाठताना इंदूर शहराने याबाबत केलेल्या उपाययोजना समजून घेऊन त्याची अंमलबजावणी नाशिक महापालिकेने करणे अपेक्षित आहे. इंदूर हे भारतातील पहिले कचरामुक्त शहरही आहे. जवळपास ३५ लाख लोकसंख्या असलेल्या इंदूर शहरात दररोज सरासरी १ हजार ९०० टन कचरा घरोघरी जमा होतो. यामध्ये १२०० टन सुका कचरा आणि ७०० टन ओला कचरा निर्माण होतो. इंदूर शहरात २०१५ मध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलनास सुरवात झाली. करण्यात आले. आता संपूर्ण इंदूर शहर कचराकोंडीमुक्त झाले असून शहराच्या वातावरणातील प्रदूषणही प्रमाणात घटले आहे.
इंदूरमध्ये कचऱ्याचे सहा श्रेणीत वर्गीकरण केले जाते आणि हेच इंदूरच्या यशाचे गमक आहे. महापालिकेच्या ८५० घंटागाड्या रोज कचरा गोळा करतात. हा कचरा गोळा करतानाच तो ओला, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, नॉन-प्लास्टिक, बायोमेडिकल आणि धोकादायक स्वरूपाचा कचरा असतो. वेगवेगळ्या स्वरूपाच्या कचऱ्यासाठी वाहनामध्ये स्वतंत्र कप्पे असतात. सॅनिटरी नॅपकिन्स हे विशिष्ट कप्प्यातच टाकले जातात.

कचरा विल्हेवाट करण्यासाठी बायो सीएनजी प्रकल्प उभारला आहे. ओल्या कचऱ्यावर हा प्लांट चालतो. हा आशियातील सर्वात मोठा प्लांट आहे. विशेष म्हणजे यातून मोठा महसूलही निर्माण होतो. व्यावसायिक सीएनजीच्या तुलनेत पाच रुपये स्वस्त पडणाऱ्या या बायोसीएनजीवर जवळपास १५० सिटी बस चालवतात. गेल्या वर्षात इंदूर महापालिका प्रशासनाने कचऱ्याच्या विल्हेवाटीतून १४.४५ कोटी रुपये कमावले. यात आंतरराष्ट्रीय बाजारात कार्बन क्रेडिटच्या विक्रीतून साडेआठ कोटी आणि खासगी कंपनींकडून वार्षिक प्रीमियम म्हणून २.५२ कोटी रुपये मिळालेले आहेत. याशिवाय इंदूरमधील सांडपाण्यावरही ३ प्लांटमध्ये प्रक्रिया केली जात आहे. या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा २०० सार्वजनिक उद्याने, शेतात व बांधकामांसाठी वापर केला जातो.