Mnerga Tendernam
उत्तर महाराष्ट्र

MGNREGA : रोजगार हमीवरील मजुरीत 20 रुपयांनी वाढ; आता मजुरी होणार..

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवरील (MGNREGA) मजुरांच्या रोजंदारी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार आता रोजगार हमी योजनेवरीला अकुशल मजुरांना २५३ रुपयांऐवजी आता २७३ रुपये मजुरी मिळणार आहे. हे दर एक एप्रिलपासून लागू होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायत, कृषी, वन, लघुपाटबंधारे, जलसंपदा आदी विभागांकडून केली जातात. ग्रामपंचायत व कृषी विभागाच्या माध्यमातून प्रामुख्याने वैयक्तिक लाभाची कामे घेतली जातात. या सर्व कामांमध्ये कुशल म्हणजे यंत्राद्वारे केली जाणारे कामे व अकुशल म्हणजे मजुरांकडून केली जाणारी कामे यांचे प्रमाण ६० :४० ठेवण्याचे बंधनकारक केले आहे.

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेतील कामांच वार्षिक आराखडा तयार केला जातो. या आराखड्यातील कामांमधून मजुरांना रोजगार मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांची वैयक्तिक व सार्वजनिक मत्ता निर्मिती केली जाते. रोजगार हमीच्या कामांमधून वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक हिताच्या योजना राबवल्या जातात. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रामुख्याने गायगोठे बांधणे, शेळ्यांचे गोठे बांधणे, वैयक्तिक शेततळे उभारणे, बांधावर वृक्ष लागवड, फळबाग लागवड, नालाबांध, भात खाचरे तयार करणे आदी कामे केली जातात. त्याचप्रमाणे सार्वजनिक कामांमध्ये मातीबांध, नालाबंडिंग, संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक, पत्र्याचे शेड उभारणे, सिमेंट बंधारे बांधणे आदी कामे केली जातात.

या दोन्ही कामांचे एकूण विचार करता अकुशल मजुरांकडून ४० टक्के काम करून घेणे बंधनकारक आहे. कुशल व अकुशल मजुरांचे प्रमाण राखण्यासाठी जिल्हास्तरावर परवानगी देण्यात आल्यामुळे रोजगार हमी योजनेतून मातोश्री पाणंद रस्ते योजना महाविकास आघाडी सरकारने तयार केली. मात्र, त्या योजनेसाठी एक किलोमीटरसाठी २३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. रोजगार हमीच्याच दुसऱ्या योजनेतून एक किलोमीटरसाठी आठ लाख रुपयांचे अंदाजपत्रक आहे. यामुळे या योजनेची कामे मोठ्यासंख्येने मंजूर करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात या योजनेतून ९९५ कामे मंजूर करण्यात आली.

दरम्यान, पाणंद रस्त्यांसाठी शेतकऱ्यांकडून संमती न मिळाल्यामुळे ही कामे सुरू होण्यास उशीर झाला. त्यातच रोजगार हमी योजनेतून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये मजुरांकडून कामे करून घेण्याऐयजी कामे यंत्राने केली जातात व मजुरांच्या नावाने देयक काढले जात असल्याच्या तक्रारी झाल्या. यामुळे केंद्र सरकारने एक जानेवारी २०२३ पासून रोजगार हमीच्या सार्वजनिक कामांवर काम करणाऱ्या मजुरांचे काम करीत असतानाचे दिवसातून दोनवेळा छायाचित्र काढून ते रोजगार हमीच्या मोबाईल ॲपवर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. यामुळे मजुरांची कामे यंत्राद्वारे करण्याच्या प्रकाराला आळा बसल्याचे बोलले जात आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या बाबतीत छायाचित्र काढणे बंधनकारक नसल्यामुळे ती कामे वेगाने सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातच केंद्र सरकारने आता रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांचे दर वाढवले आहेत. ग्रामपंचायत विभागाने सर्व ग्रामपंचायतींना याबाबत सूचना दिल्या असून ग्रामरोजगार सेवकांनी एक एप्रिलपासून मजुरांची हजेरी नोंदवल्यानंतर त्यांची मजुरी ठरवताना २७३ रुपयांप्रमाणे आकारणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. मजुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार हमीच्या कामांसाठी मजुरांची संख्या वाढण्याची आशा ग्रामपंचायत विभागाने व्यक्त केली आहे.