Trimbakeshwar Temple Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: त्र्यंबकेश्वर देवस्थानचा 'या' कारणांमुळे बदलणार चेहरामोहरा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या (Trimbakeshwar Temple) परिसराचा चेहरामोहरा बदलतोय. पुरातत्व विभागाची परवानी घेऊन भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था तसेच भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता नजरेसमोर ठेवून ही कामे केली जात आहे.

केंद्र सरकारची प्रसाद योजना व देवस्थानकडील निधी यातून सुमारे चाळीस कोटींची एकत्रित कामे सुरू असून, यातून त्र्यंबकेश्वर देवस्थानचा चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश विकास कुलकर्णी आणि विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली.

बाराव्या शतकामध्ये यादव काळात त्र्यंबकेश्‍वर ज्योतिर्लिंग मंदिराची उभारणी केली. मुघलांच्या काळात मंदिर पाडण्यात आले. पेशवाईमध्ये नानासाहेब पेशवे यांच्या कार्यकाळात अहल्यादेवींनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला. या मंदिराचे १७५५ ते १७८६ या काळात सोळा लाख रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले.

दिवसेंदिवस लोकसंख्या वाढल्याने रात्रंदिवस त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची संख्या वाढत आहे. तीर्थस्नान, दर्शन, पूजा-विधीसाठी वर्दळ वाढली. मात्र, त्र्यंबकेश्वरनगरी ब्रह्मगिरी पर्वत रांगेच्या पायथ्याशी असल्याने विकासासाठी उपलब्ध जागेचा प्रश्न आहे. यातून मार्ग काढत त्र्यंबकेश्‍वर देवस्थान व केंद्र सरकारची प्रसाद योजना यातून ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरात विविध विकामकामे सुरू आहेत.

देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे दर्शन रांगा कायम स्वरूपी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाविकांना वातानुकूलित व्यवस्थेसह गर्भगृह दर्शनासाठी मोठ्या आकाराचे स्क्रीन लावण्यात आले आहेत. सर्वत्र विद्युत आणि मंदिर परिसरात दगडी कोटाचे काम सुरू आहे. त्र्यंबकेश्‍वर मंदिर १९४० पासून केंद्रीय संरक्षित स्थळ म्हणून अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यामुळे इथे बदल करण्यात अडचणी येत आहेत.

पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेत अडचणीची कामे मार्गी लावली जात आहेत. देवस्थानच्या भाविकांच्या निवास व्यवस्था इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. यात्रेकरूंच्या निवासासाठी अद्ययावत व्यवस्था केली जाते. इमारतीच्या सभागृहात प्रसाद व्यवस्था करण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्‍वर मंदिर परिसरातील कामे
- दर्शनासाठी वातानुकूलित रांग व्यवस्था. यात बसण्याची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची सोय. - अद्ययावत प्रसाधनगृहे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दहा ते बारा कोटींचा खर्च
- मंदिराच्या सभोवताली हद्दीतील दगडी भिंत आणि स्वतंत्र विद्युतव्यवस्था
- शिवप्रसादालय या देवस्थानच्या इमारतीची डागडुजी व निवासव्यवस्था, प्रसादालय

- मंदिरातील आरसे महाल दुरुस्ती व विद्युतीकरण
- सुरक्षेसाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर