Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : आडगावच्या ट्रक टर्मिनलमधील इलेक्ट्रिक बसडेपोला विरोध

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने इलेक्ट्रिक बसेससाठी प्रस्तावित केलेल्या इलेक्ट्रिक बसडेपो व चार्जिंग स्टेशनला नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन संघटनेने विरोध केला आहे. आडगाव येथील ट्रक टर्मिनल येथे येणाऱ्या वाहन चालकांसाठी या ठिकाणी सारथी सुविधा भवन उभारण्याची त्यांनी मागणी केली आहे. या प्रस्तावित बस डेपो व चार्जिंग स्टेशनच्या जागेची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली असून त्यानंतर ते ठिकाण निश्चित केले आहे. याठिकाणी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत निधीतून १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आडगाव येथे ट्रक टर्मिनल उभारण्यात आलेला आहे. मात्र, नाशिक महापालिकेने याठिकाणी १०० इलेक्ट्रिक बससाठी बसडेपो प्रस्तावित केला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी  नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्ताची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ट्रक टर्मिनल बाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. यामुळे ट्रान्सपोर्ट असोसिएशन पदाधिकारी नाराज झाले. त्यामुळे संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देत प्रस्तावित बस डेपोविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आला. याबाबत संघटनेच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, आमदार राहुल ढीकले, आमदार देवयांनीताई फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देखील निवेदन दिले.

नाशिक मधील वाहतूक सुरळीत राहावी अपघात कमी व्हावे, वाहतूकोंडी होऊ नये,यासाठी आडगाव येथे वीस वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनल विकसित केले होते. यामध्ये शहरातील द्वारका, तपोवन कॉर्नर,जुना आडगाव नाका येथे मोठ्या प्रमाणात असलेले गॅरेज व वाहनांच्या स्पेअर पार्टची दुकाने ही आडगांव ट्रक टर्मिनल मध्ये विकसित करण्यात आले होते.  या ट्रक टर्मिनलमध्ये व्यापारी गाळे व वाहन दुरुस्तीसाठी ओटे व सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्याची वेळोवेळी डागडुजी करुन आवश्यक व्यवस्था करुन चांगली निगा ठेवली असती तर एक चांगल मॉडेल तयार झालं असत. मात्र, हे ट्रक टर्मिनल दुर्लक्षित ठेवले आणि आता याठिकाणी ईलेक्ट्रिक बस डेपो उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये असंतोष पसरला आहे. ईलेक्ट्रिक बस वाहतूक व्यवहार्य होण्यासाठी हा डेपो शहराच्या अधिक जवळ असणे आवश्यक आहे. मात्र आता हा डेपो शहराच्या बाहेर आडगांव ट्रक टर्मिनल बाहेर १० किलोमीटर अंतरावर निर्माण करण्यात येत आहे. वास्तविक यामुळे जाताना आणि येताना २० किलोमीटर अंतर अधिक खर्ची  होणार आहे. त्यामुळे हा डेपो कितपत व्यवहारी होईल याबाबत शंका ट्रान्सपोर्ट असोसिएशनने उपास्थित केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी मागीलवर्षी नाशिकमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी नाशिक शहराच्या चारही बाजूला बंद जकात नाक्यांवर आडगाव ट्रक टर्मिनलसह सर्व जकात नाक्यांवर ट्रक टर्मिनल विकसित करावे. तसेच नाशिक हे देशातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने शेती मालासाठी व औद्योगिक मालासाठी राष्ट्रीय लॉजिस्टीक पार्क उभारता येईल अशा सूचना महापालिकेसह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र अद्यापही यावर प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे वाहतूकदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आडगावसह शहरात सर्व जकात नाक्यांवर निर्माण होणाऱ्या ट्रक टर्मिनलमध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण व्हावे यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, ट्रक टर्मिनल विकसित होणे दूर राहिले असून या प्रकरणासाठी राखीव असलेला भूखंड देखील इतरत्र वापरला जात आहे, ही अतिशय खेदाची बाब असल्याचे सांगत आडगाव येथील ट्रक टर्मिनलचा विकास करतांना येथे सारथी सुविधा केंद्राच्या धर्तीवर याचा विकास व्हावा, अशी ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी आहे. तसेच आडगाव येथील इलेक्ट्रिक बसडेपो इतरत्र हलावण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.