Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : नगररचनाच्या आडकाठीमुळे रखडले ब्लॅक स्पॉट निर्मूलन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : छत्रपती संभाजीनगर मार्गावरील हॉटेल मिरची चौकात मागील वर्षी अपघात होऊन बारा जणांना प्राण गमवावे लागले होते. या अपघातानंतर चौकातील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महापालिकेने चार वेळा स्मरणपत्र देऊनही नगररचना विभागाकडून अतिक्रमणे हटवण्यासाठी डीमार्केशन करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेशित केलेली प्रक्रिया खोळंबल्याचे दिसत आहे.

छत्रपती संभाजी मार्गावरील हॉटेल मिरची लगत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी बस अपघात होऊन १२ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत घटनास्थळी भेट दिली. नाशिक शहरातील वाढत्या अपघातांची दखल घेऊन अपघात प्रवणक्षेत्रे अर्थात ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका व बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महापालिका या सरकारी संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची रस्ते सुरक्षा समिती गठित करून शहरांतील अपघात प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीने शहरांमध्ये २६ ब्लॅक स्पॉट असल्याचा अहवाल सादर केला.

यातील सात अपघातस्थळावरील अतिक्रमणे तातडीने हटवणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. महापालिकेकडून अपघातग्रस्त हॉटेल मिरची चौकातील अतिक्रमणे हटवण्यात आले. मात्र रस्त्याला लागून असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली नाही. उर्वरित अतिक्रमणे हटवण्यासाठी डिमार्केशन होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने अतिक्रमण विभागाने २३ जानेवारी २०२३, २० मार्च २०२३ तर ११ एप्रिल २०२३ रोजी असे तीन पत्रे दिले. मात्र, नगररचना विभागाने एकाही पत्राची दखल घेतली नाही व डिमार्केशन केले नाही.  त्यामुळे १२ जून २०२३ ला पुन्हा चौथे स्मरणपत्र सादर केले.

रस्त्यालगतची अतिक्रमणे तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या हटवण्यासाठी डीमार्केशन करावे, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. हॉटेल मिरची चौकाबरोबरच निलगिरी बाग, जत्रा हॉटेल चौफुली, नांदूर नाका चौक, पाथर्डी फाटा, रासबिहारी चौक, बळी मंदिर चौक, तारवाला नगर सिग्नल या ठिकाणचेदेखील अतिक्रमणे हटवण्यासाठी डिमार्केशन करावे अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.