Toll Plaza Tendernama
उत्तर महाराष्ट्र

पुणे-नाशिक महामार्गावर टोलची दरवाढ; आता मोजावे लागणार..

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक - पुणे महामार्गावरील नाशिक तालुक्यातील शिंदे टोल नाका येथील टोल करात १६ ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून वाढ जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिक - पुणे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड व व्यावसायिक वाहनधारकांना भुर्दंड बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्यांनी ही दरवाढ जाहीर केली असून, २५ किलोमीटर अंतरासाठी हे वाढीव दर लागू राहणार आहेत. दरम्यान या दरवाढीतून स्थानिकांसाठी असलेले मासिक पास व चारचाकी वाहनांचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. यामुळे चारचाकी वाहनांसाठी एकेरी प्रवासाचे दर ४० रुपये व पासची रक्क ३१५ रुपये कायम राहणार आहे. (Pune - Nashik Highway Toll)

नाशिक महापालिका हद्दीपासून केवळ पाच किलोमीटर अंतरवर नाशिक - पुणे महामार्गावर शिंदे येथे टोल प्लाझा आहे. नाशिक-पुणे महामार्ग क्रमांक ६० वर सिन्नर ते नाशिक या भागातील मार्गाचे बांधा, वापरा, हस्तांतरीत करा, या योजनेतून चौपदरीकरण झाल्यानंतर १० नोव्हेंबर २०१७ पासून या मार्गावर वाहनांना टोल आकारणी लागू झाली आहे. टोल प्लाझापासून २० किलोमीटर परिघातील रहिवाशांना स्थानिक सवलतीचा लाभ दिला जातो. या टोल प्लाझापासूनच्या २० किलोमीटरच्या परिघात जवळपास निम्मे नाशिक शहर येते. मात्र, स्थानिक नागरिकांना असलेली सवलत केवळ नाशिकरोड भागातील रहिवाशांना दिली जाते. यावरून बरेचदा वाद व आंदोलने झाली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग विभाग व सिन्नर-नाशिक टोलवेज लिमिटेड या कंपनीमध्ये २ मार्च २०१६ ला झालेल्या करारानुसार ही टोल आकारणी केली जाते व दरवर्षी टोलकरामध्ये वाढ जाहीर केली जाते. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने नाशिक - पुणे महामार्गावरील शिंदे येथे टोल नाका येथून जाणाऱ्या वाहनांसाठी नवीन दर खालील प्रमाणे आहेत.

नवे दर


वाहन प्रकार               एकेरी प्रवास          स्थानिक वाहनांसाठी
कार, जीप, व्हॅन           ४० रुपये                  २० रुपये    
मिनी बस                       ६५                         ३५
बस - ट्रक                   १४०                         ७०                  
व्यवसायिक तीन एक्सेल     १५०                         ७५
चार ते सहा ॲक्सेल         २१५                         ११०
सातहून आधिक ॲक्सल     २६५                       १३०