नाशिक (Nashik) : पिंपळगाव बाजार समितीन नुकतेच १५ कामांसाठी अकरा कोटींची टेंडर प्रक्रिया राबवली. यात एका संचालकाच्या नातेवाईकाला त्यापैकी बारा कामे देण्यात आल्याचा आरोप विरोधी गटातील संचालकांनी केला आहे. तसेच आमदार तथा बाजार समिती सभापती दिलीप बनकर बहुमताच्या बळावर कामे रेटून नेत असून बाजार समितीने फेरटेंडर प्रक्रिया न राबवल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा माजी आमदार व संचालक अनिल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
जिल्ह्यातील एक प्रमुख बाजार समिती असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या संचालक मंडळाची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. या बैठकीत माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटातील संचालकांनी विकासकामे करण्यासाठी राबवलेल्या टेंडर प्रक्रियेविषयी तक्रार केली. यावरून सभापती तथा आमदार दिलीप बनकर व विरोधी गटातील सदस्यांमध्ये बाचाबाची झाली होती. संचालक मंडळाच्या बैठकीत भूमिका मांडता न आल्याने माजी आमदार अनिल कदम, अमृता पवार, गोकुळ गिते,दिलीप मोरे, राजेश पाटील या संचालकांनी पत्रकार परिषद घेत पिंपळगाव बसवंत बाजार समितीने राबवलेल्या टेंडर प्रक्रियेत नियम पायदळी तुडवून बाहेरच्या जिल्ह्यातील ठेकेदारांना कामे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी आमदार कदम म्हणाले, स्थानिकांना डावलून व टेंडर प्रक्रियेचे नियम धाब्यावर बसवून एका संचालकांच्या नातलगाला १५ पैकी १२ कामे दिली आहेत. बाजार समितीच्या आवारात चार कोटी रुपयांच्या पेव्हरब्लॉकचे काम दोन कोटी रुपयांमध्ये करून देण्यास एक ठेकेदार तयार होता. पण मर्जीतील ठेकेदाराला कामे देण्याचा अट्टाहास त्यांनी धरला असल्याचा आरोप त्यांनी केला.