Electric bus Tendernaam
उत्तर महाराष्ट्र

Nashik:इलेक्ट्रिक चार्जिंगस्टेशन टेंडर; टाटा, रिलायन्सची माघार का?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण अंतर्गत नाशिक महापालिकेतर्फे शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, त्यात पहिल्या टप्प्यातील २० चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी राबवलेल्या टेंडर प्रक्रियेतून टाटा, रिलायन्स सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी माघार घेतली आहे. या टेंडरला दिलेल्या मुदतवाढीनंतर या कंपन्या बाहेर पडल्या असून त्याऐवजी आता इतर सात कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. सध्या या टेंडरचा तांत्रिक लिफाफा उघडला असून या कंपन्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

पारंपरिक इंधनावर होणारा खर्च, त्यामुळे वाढणारी महागाई व वाहनांची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या शहरांमध्ये केंद्र शासनाने चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निधी दिला आहे. महापालिकेने २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी यादी सादर केली. नॅशनल क्लीन एअर पॉलिसी(एन कॅप) अंतर्गत ३५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. ईव्ही स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली.

त्यात प्रिबीड मिटींगमध्ये टाटा पॉवर, टायर रेक्स ट्रान्समिशन प्रा. लि., एनर्जी सोल्युशन्स, रिलायन्स जिओ, बीपी बग, इनोझा लिमिटेड, निना हैंड्स इव्हिंगो चार्जप्रा. लि., रेशनसॅन टेक इलेक्ट्रिकल्स,राजसन इलेक्ट्रॉनिक्स, एस अँड टीप्रा. लि., पुनम वेंचर्स इंडिया प्रा. लि.,युनिक एंटरप्राइजेस लैब्स डब्ल्यूबीआयइंडस्ट्रीज या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपन्यांनी नाशिकमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली. दरम्यान या बैठकीनंतर विद्युत विभागाने नव्याने टेंडरला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या मुदतवाढीच्या काळात पुर्वीच्या कंपन्यानी माघार घेत इतर कंपन्यांनी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी सहभाग नोंदवल्याचे तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर समोर आले. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे प्रिबीड मीटिंगमध्ये असे काय घडले की त्यानंतर मोठ्या कंपन्यांनी माघार घेतली, अशी चर्चा आहे.

या सात कंपन्या इच्छुक

नाशिक शहरात २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन्सची उभारणीच्या टेंडरला ३० मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत निना हॅण्डस्, मरिन इलेक्ट्रीकल्स प्रा. लि, टेस्को चार्ज झोन लिमिटेड, मावेन कार्पोरेशन, शरिफाय सर्व्हिसेस प्रा. लि., जिवाह इंटरनॅशनल प्रा. लि., तसेच युनिक एंटरप्रायझेस या सात कंपन्यांनी सहभाग घेतला आहे.