Swachh Bharat Mission Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२’मध्ये जिल्हा अग्रेसर; प्रत्येक तालुक्यांत...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सद्यःस्थितीत पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी समस्या ही प्लॅस्टिक आहे. या संदर्भात प्रक्रिया व्यवस्थापन करून प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, कचऱ्यावर प्रक्रिया व प्लॅस्टिकचे मूल्यवाढ आदी गोष्टींसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन युनिट स्थापन करण्यात आले आहे. यापैकी नऊ तालुक्यांमध्ये युनिट कार्यान्वितदेखील झाली आहेत.

नाशिक तालुक्यातील पिंप्री सय्यद येथील प्लॅस्टिक व्यवस्थापन युनिटला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली. प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन युनिटच्या कार्यपद्धतीची या वेळी त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. युनिट चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केल्याबद्दल त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणाचे अभिनंदन केले. पुढील काळात प्लॅस्टिक संकलन करून या युनिटच्या माध्यमातून प्लॅस्टिक व्यवस्थापनाचे काम करावे, अशा सूचना या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. या केंद्रामुळे प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे सोपे होणार असून शास्त्रीय पद्धतीने प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. तरी देखील नागरिकांनी प्लॅस्टिक वापर कमीत कमी करावा आणि वापरलेल्या प्लॅस्टिकचे संकलन ग्रामपंचायत स्तरावर करावे, प्लॅस्टिकमुळे गावातील पर्यावरण धोक्यात येणार नाही याबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मित्तल यांनी केले.

जिल्ह्यात १,३८८ ग्रामपंचायती असून १,९१० महसुली गावे आहेत. त्यापैकी ११६ गावे ही ५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्येची आहेत. ती सोडून उर्वरित सर्व गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत. सुमारे १,२०० गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व गावे ‘मॉडेल व्हिलेज’ करायची असल्याने त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, मैला-गाळ व्यवस्थापन आदी कामे करणे आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये या सर्व घटकांचे नियोजन पूर्ण झाले असून बहुतांश ठिकाणी कामेदेखील सुरू झाली आहेत, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी दिली. या वेळी गटविकास अधिकारी डॉ. सोनिया नाकाडे, विस्तार अधिकारी जगन्नाथ सोनवणे, श्रीधर सानप, स्वच्छता तज्ज्ञ संदीप जाधव, ग्रामविकास अधिकारी डी. पी. गांगुर्डे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.