Surat -Chennai Expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Surat-Chennai Highway मोठी बातमी; फेब्रुवारीपासून भूसंपादन

Nashik जिल्हाधिकाऱ्यांकडून जानेवारीत हरकती निकाली काढण्याचे आदेश

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी (Surat-Chennai Greenfield Highway) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या तालुक्यांमधील भूसंपदनाबाबत दाखल दावे आणि हरकतींवर जानेवारीअखेरपर्यंत निर्णय द्यावा व ते दावे निकाली काढावेत, असे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी भूसंपादनाशी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यामुळे जानेवारी अखेरीस या महामार्गासाठी प्रस्तावित भूसंपदनाबाबतचे दावे निकाली निघाल्यानंतर फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष जमिनींची खरेदी प्रक्रिया सुरू होऊ शकणार आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-चेन्नई हा एक हजार २७० किलोमीटरचा ग्रीनफिल्ड महामार्ग साकारला जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील नाशिक, नगर व सोलापूर या जिल्ह्यातून जाणार असून नाशिक जिल्ह्यातील सुरगारा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सिन्नर या सहा तालुक्यांतील जमिनी या महामार्गासाठी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत.

प्रकल्पाचे कामकाज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत होणार असले तरी त्यासाठी आवश्यक जमीन संपादनाची जबाबदारी महसूल विभागाला पार पाडावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने नाशिक, निफाड, सिन्नर व दिंडोरी या चार तालुक्यांमधील भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली.

या बैठकीत बाधित शेतकरीव स्थानिकांनी जादा मोबदला मिळावा, अधिग्रहणावेळी संपूर्णक्षेत्र घ्यावे, जमिनीची योग्य प्रकारे मोजणी करावी यांसह अन्य काही हरकती व सूचना नोंदविल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर जानेवारी अखेरपर्यंत दाखल सर्व दावे निकाली काढावेत, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले. यावेळी सहाही तालुक्यांतील महसूल अधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणाचा अडथळा
नाशिक जिल्ह्यात सहा तालुक्यांत तीन पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम होणार आहे. त्यात पेठ व सुरगाणा तालुक्यात पर्यावरणाच्या परवानगीअभावी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे उर्वरित चार तालुक्यांतील पॅकेजबद्दलचा अहवाल प्रशासनाने राष्ट्रीय प्राधिकरणाच्या मुख्यालयात पाठविला आहे.

महामार्गाची वैशिष्ट्ये
- या महामार्गामुळे नाशिक सुरत दरम्यानचे अंतर १७६ किलोमीटरवर येणार
- नाशिक ते सोलापूर अंतरात ५० किलोमीटरची कपात होणार आहे
- या महामार्गामुळे सुरत चेन्नई हे १६०० किलोमीटरचे अंतर १२५० किलोमीटरपर्यंत कमी होणार
- सुरत, नाशिक अहमदनगर, सोलापूर, हैदराबाद, चैन्नई ही महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत